Demand for a DNA test of an AIMIM corporator : तीन अपत्ये लपवल्याचा आरोप; मनपाने मागविला खुलासा, सात दिवसांची मुदत
Amravati अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये जमिल कॉलनी-लालखडी प्रभाग क्रमांक ४ (ड) मधून निवडून आलेले ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम)चे नगरसेवक सलाहुद्दीन इकरामुद्दीन यांच्याविरोधात अपत्यांची संख्या लपविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्या तिसऱ्या अपत्याची डीऑक्सिरायबोन्यूक्लिइक ॲसिड (डीएनए) चाचणी करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने नगरसेवकांना पत्र पाठवून सात दिवसांत वस्तुस्थितीदर्शक खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
नगरसेवक सलाहुद्दीन इकरामुद्दीन यांनी निवडणूक लढविताना अपत्यांसंबंधी चुकीची माहिती दिल्याचा आरोप करीत शफीक राजा यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. सलाहुद्दीन आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी शबनम सैय्यद यांच्यापासून झालेल्या कथित तिसऱ्या अपत्याची डीएनए चाचणी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
SIR campaign : अमरावती जिल्ह्यात वाढणार ८० केंद्र; चार मतदारसंघांत केंद्रांची वाढ
निवडणुकीच्या वेळी अपत्यांची संख्या लपवून खोटी माहिती दिल्याचे सिद्ध झाल्यास नगरसेवकपद रद्द करावे, तसेच संबंधितांविरुद्ध फौजदारी व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही तक्रारदाराने केली आहे.
मनपाचे सात दिवसांचे ‘अल्टिमेटम’
या तक्रारीची दखल घेत अमरावती महापालिकेचे नगर सचिव संदीप वडुरकर यांनी ५ ऑगस्ट रोजी नगरसेवक सलाहुद्दीन यांना पत्र बजावले. ‘सदर प्रकरणाच्या अनुषंगाने आपला वस्तुस्थितीदर्शक खुलासा आयुक्तांसमक्ष सात दिवसांच्या आत सादर करावा,’ असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे नगरसेवकांकडून १२ ऑगस्टपर्यंत कोणता खुलासा सादर केला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, नगरसेविका बिबी बतुल शाह यांच्याशी संबंधित प्रकरणही आयुक्तांकडे प्रलंबित असल्याची माहिती आहे.








