Political conflict intensifies over the suspension of Shiv Sena corporator Sagar Bharuka : सागर भारुका यांना ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा; मनपा प्रवेशद्वारासमोर सत्ताधारी आघाडीचे आंदोलन
Akola महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक सागर भारुका यांच्या निलंबनावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अपशब्दांचा वापर केल्याचा तसेच महिला सदस्यांशी आक्षेपार्ह भाषेत बोलल्याचा आरोप झाल्यानंतर भारुका यांच्यावर १५ दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर भारुका यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच, आता सत्ताधारी शहर सुधार आघाडीनेही त्यांना थेट प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे.
महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शहर सुधार आघाडीचे नगरसेवक व पदाधिकारी एकत्र आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भारुका यांच्याकडून सत्ताधारी पक्षावर करण्यात येत असलेल्या आरोपांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उठसूट, बेछूट, निराधार आणि तथ्यहीन आरोप करून महापालिका प्रशासनाची तसेच सत्ताधाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
आरोप करताना पुरावे द्या
सागर भारुका यांच्याकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात असल्याचा दावा शहर सुधार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. कोणताही आरोप करताना त्यामागे ठोस तथ्य, कागदपत्रे किंवा पुरावे असणे आवश्यक आहे. केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी तथ्यहीन आरोप केले जात असतील, तर त्याला यापुढे ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप
आंदोलनादरम्यान भारुका यांच्या कथित गैरवर्तनामुळे महापालिकेची तसेच अकोला शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी सभागृहात जबाबदारीने वर्तन करणे अपेक्षित आहे. सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, अशा प्रकारचे वर्तन योग्य नसल्याचेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
आरोप-प्रत्यारोपांनी संघर्ष वाढण्याची शक्यता
एकीकडे भारुका निलंबनाच्या कारवाईविरोधात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे शहर सुधार आघाडीने त्यांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Amravati Municipal corporation : महापालिकेतील दोन कोटींच्या दंडाची फाईल गायब?
यावेळी महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, सभागृह नेते पवन महल्ले, करण शाहू आदी उपस्थित होते.
“उठसूट आणि तथ्यहीन आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. आरोप करताना पुरावे द्या; अन्यथा यापुढे जशास तसे उत्तर देऊ. महापालिका आणि शहराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.”
— पवन महल्ले, सभागृह नेते, महापालिका








