व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Pruthviraj chavan: २०१४ मध्येच शिवसेनेकडून महाविकास आघाडीच्या स्थापनेचा प्रस्ताव; पण मीच फेटाळून...

Pruthviraj chavan: २०१४ मध्येच शिवसेनेकडून महाविकास आघाडीच्या स्थापनेचा प्रस्ताव; पण मीच फेटाळून लावला

Shivsena had proposed forming the Maha Vikas Aghadi as early as 2014, reveals Pruthviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Mumbai भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने २०१४ मध्येच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर भाजपने सत्ता स्थापन केली व देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. या घडामोडींवर प्रकाश टाताना चव्हाण म्हणाले की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे, असा प्रस्ताव २०१४ मध्येच एका मित्र पक्षाच्या माध्यमातून आला होता. मात्र, तो प्रस्ताव मी तत्काळ फेटाळून लावला. निवडणुकीतील जय-पराजय ही साधी गोष्ट आहे आणि त्या वेळी आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्याला किंवा वरिष्ठ नेतृत्वाला शिवसेनेसोबत जाणे अजिबात पटले नसते.

२०१४ चा प्रस्ताव फेटाळल्यानंतर २०१९ मध्ये हाच प्रस्ताव आपण स्वतः पुढे ठेवल्याचे स्पष्ट करत चव्हाण म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पाच वर्षांत भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तब्बल १७५ नेते फोडले. ईडी, सीबीआय, आयकर विभागाची भीती दाखवून राजकीय समीकरणे बदलली गेली. २०१९ पर्यंत मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात देशभरात मोठा रोष निर्माण झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास मंजुरी दिली आणि २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले.

अडीच वर्षांनंतर भाजपने राजकीय डावपेच खेळून शिवसेना फोडली आणि पुन्हा सत्ता हस्तगत केली; परंतु जर २०१४ मध्येच महाविकास आघाडी आकाराला आली असती, तर आज महाराष्ट्राचे राजकीय चित्र पूर्णपणे वेगळे असते. शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसती आणि भाजपला राज्यात मूळ धरण्याची किंवा पक्ष फोडण्याची संधीच मिळाली नसती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

error: Content is protected !!