mahayuti-politics-sadabhau-khot-ayaram-vs-loyalist-ministerial-berth-bjp-ncp-shiv-sena : एका वक्तव्याने महायुतीतील ‘आयाराम विरुद्ध निष्ठावंत’ संघर्ष पुन्हा ऐरणीवर
Nagpur : ‘बाहेरून सरदार आले आणि मंत्री झाले, आपण फक्त बघत बसलो… आपल्यावर काय वाईट वेळ आलीय,’ सदाभाऊ खोत यांच्या या एका वक्तव्याने महायुतीच्या सत्ताकारणातील एक जुनी अस्वस्थता पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. हा केवळ मंत्रिपद न मिळाल्याचा राग आहे की, वर्षानुवर्षे पक्षासाठी उभ्या राहिलेल्या निष्ठावंतांच्या मनात साचलेली व्यापक नाराजी? खोतांच्या शब्दांनी हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
मंत्रिपदाच्या वाटपावर थेट बोट ठेवताना खोत यांनी ‘आम्हीही तुमचेच आहोत’ असे सांगितले. त्यानंतर ‘वाड्यातले सरदार फडणवीसांच्या पायाला जाऊन मिठी मारतात. हे सरदार आले आणि साहेबांच्या पायाला लागले. ते मंत्री झाले आणि आपण फक्त बघत बसलो,’ असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्याचा रोख स्पष्ट होता सत्तेच्या समीकरणात बाहेरून आलेल्यांना झटपट महत्त्व मिळते; मात्र जुने सहकारी आणि निष्ठावंतांना संधीसाठी प्रतीक्षा करावी लागते. याच ठिकाणी ‘आयाराम विरुद्ध निष्ठावंत’ हा भाजपसह महायुतीच्या राजकारणातील संवेदनशील मुद्दा पुढे येतो. सत्ता विस्तारताना विविध पक्षांतून नेते महायुतीत दाखल झाले. काहींना निवडणुकीत संधी मिळाली, काहींना पदे मिळाली, तर काही थेट सत्तेच्या केंद्रात पोहोचले. दुसरीकडे वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर मात्र ‘आपले स्थान कुठे?’ हा प्रश्न उभा राहिला.
Maharashtra SIR : महाराष्ट्रातील 2 कोटींहून अधिक, मतदारांची नावे ड्राफ्ट यादीतून गायब;
ही अस्वस्थता केवळ सामान्य कार्यकर्त्यांपुरती मर्यादित नाही. राजकीय वजन असलेल्या नेत्यांनाही जेव्हा नव्याने आलेल्यांना तुलनेने मोठे स्थान मिळताना दिसते, तेव्हा ‘आम्ही एवढी वर्षे काय केले?’ हा सवाल साहजिकच पुढे येतो. सत्ता मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्यांना प्रतीक्षा आणि सत्तेच्या जवळ आलेल्यांना थेट खुर्ची, अशी भावना निर्माण झाली तर त्याचे राजकीय पडसाद उमटणे स्वाभाविक आहे. महायुतीची रचना पाहता हा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांना सत्ता सांभाळताना एकमेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षांचा समतोल साधण्याची कसरत करावी लागते. प्रत्येक पक्षाला आपला विस्तार हवा आहे आणि प्रत्येक गटाला सत्तेत आपला वाटा हवा आहे. त्यामुळे मंत्रिपदापासून महामंडळांपर्यंत प्रत्येक निर्णयामागे राजकीय गणित असते. या गणितात निष्ठावंतांच्या अपेक्षा मागे पडल्या तर नाराजीचा आवाज वाढणारच.
Hiwarkhed Municipal Council : हिवरखेड नगरपरिषदेत नगरसेवकाला मारहाण; सीसीटीव्ही कक्ष पोलिसांकडून सील
खोत यांच्या वक्तव्याने त्याच नाराजीला शब्द मिळाले आहेत. मात्र खोत यांनी नेतृत्वावर थेट प्रश्नचिन्ह उभे केलेले नाही. उलट त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलताना ‘आपला विस्थापित व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि प्रस्थापित त्याच्यासमोर लोटांगण घालू लागले, हा खरा विजय आहे,’ असे ते म्हणाले. म्हणजे खोतांच्या बोलण्यात एकीकडे सत्तावाटपावर बोचरी नाराजी आहे, तर दुसरीकडे पक्ष नेतृत्वाला स्पष्ट पाठिंबा आहे. त्यामुळे हा संघर्ष सत्तेतील वाटा आणि निष्ठावंतांच्या स्थानासाठीचा दबाव म्हणून पाहिला जात आहे.
पण प्रश्न आता महायुतीसमोर आहे. नवे सहकारी जोडून सत्ता मजबूत करताना जुन्या निष्ठावंतांची नाराजी किती वाढू द्यायची? कारण सत्ता टिकवण्यासाठी आकड्यांचे गणित महत्त्वाचे असते; मात्र निवडणूक जिंकण्यासाठी तळागाळातील संघटन आणि निष्ठावंत कार्यकर्तेही तितकेच निर्णायक असतात. सदाभाऊंची खदखद त्यामुळे एका मंत्रिपदापुरती मर्यादित राहत नाही. ती महायुतीच्या सत्ताकारणाला पडलेला एक प्रश्न आहे खुर्च्या वाढत आहेत, पण त्या खुर्च्यांवर बसण्याची प्रतीक्षा करणारे जुने चेहरे किती काळ शांत राहणार?
__








