manoj-jarange-patil-health-deteriorates-government-assurance-midnight-call : अडीच वाजता फोन, सरकारकडून सकाळपासून कार्यवाहीचे आश्वासन
Jalna : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असतानाच त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने मराठा समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उपोषणाच्या अकराव्या दिवशी मध्यरात्री त्यांची प्रकृती बिघडली. वजन कमी होण्यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाबही कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती गंभीर होत असल्याची माहिती मिळताच सरकारकडून हालचाली सुरू झाल्या.
मध्यरात्री अडीच वाजता जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावल्याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली. यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. सकाळपासून मागण्यांबाबत कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Shivendraraje Bhosale : उगीच आम्हाला डिवचण्याचे काम करू नका, तुम्हाला परवडणार नाही !
या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी सलाईन घेण्यास तयारी दर्शवली. मात्र, मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली. यापूर्वी त्यांनी उपचार आणि पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. दरम्यान, जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहागड परिसरातील पैठण फाटा येथे मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने आंदोलकांनी रास्ता रोको केला. काही आंदोलकांनी टायर जाळून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
Manoj Jarange : मराठा आरक्षणावरून राजकीय रणकंदन! मनोज जरांगे यांचा शिंदे सेनेवर गंभीर आरोप
पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही काळ आंदोलक रस्त्यावरच ठिय्या देऊन सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची स्थिती आणि सरकारकडून मागण्यांवर होणारी कार्यवाही यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर आणि नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. शिवसेना शिंदे गटातील या दोन्ही आमदारांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे.








