Youth congress protest against akola municipal corporation : युवक काँग्रेस रस्त्यावर; प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी, तीव्र आंदोलचा इशारा
Akola शहरातील डाबकी रोड परिसरात पाईपलाईन लिकेजमुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला झाल्याने युवक काँगेस रस्त्यावर उतरली आहे. युवक काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी थेट खड्ड्यात उतरून महानगरपालिकेच्या कारभाराचा निषेध करत मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
डाबकी रोडवरील पाईपलाईन लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्याखाली व परिसरात झिरपत असून, त्यामुळे रस्त्याची अवस्था धोकादायक झाली आहे. या खड्ड्यामुळे वाहनचालक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक आकाश कवडे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त आंदोलन करण्यात आले.
पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने रस्ता खचत असून, प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता तातडीने लिकेज दुरुस्त करून खड्डा बुजवावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.
Amruta Fadnavis : गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशाला हरकत काय? राणेंच्या भूमिकेला अमृता फडणवीसांचा छेद
शहरातील मूलभूत सुविधांच्या देखभालीकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, नागरिकांच्या जीवाशी खेळणारा हा ढिसाळ कारभार आणखी किती दिवस सहन करायचा? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, रस्ता दुरुस्ती आणि पाईपलाईन लिकेजची कायमस्वरूपी व्यवस्था तातडीने न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
डाबकी रोडवरील पाईपलाईन लिकेजमुळे निर्माण झालेला जीवघेणा खड्डा नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत असताना महानगरपालिका प्रशासन नेमके कोणत्या दुर्घटनेची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल अकोला युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे. खड्ड्यात उतरून आंदोलन करण्याची वेळ नागरिकांवर येत असेल, तर मनपाच्या यंत्रणेचे अस्तित्व नेमके कशासाठी? असा सवाल करत तातडीने दुरुस्ती न झाल्यास प्रशासनाविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.








