काही दिवसावर आलेल्या युतीच्या बैठकीकडे लक्ष!
Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. महायुतीचे बँकेवरील वर्चस्व स्पष्ट झाले असले, तरी अध्यक्षपदाचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. लवकरच युतीची बैठक होण्याची शक्यता असून, त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, खासदार संजय देशमुख यांच्या नावाची चर्चा आघाडीवर असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत जिल्हा परिषद पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राजूदास जाधव आणि नेर तालुका गटाच्या संचालक स्नेहल भाकरे यांची नावेही चर्चेत आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना महायुतीतील नेत्यांना राजकीय समतोल, संचालकांचे पाठबळ आणि नेतृत्वाची स्वीकारार्हता या बाबींचा विचार करावा लागणार आहे. बँकेवरील वर्चस्व असूनही अध्यक्षपदाची निवड सहज होईल, असे चित्र सध्या दिसत नाही.
डफरिन अग्निकांडाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह; अहवाल स्वीकारला नसेल, तर निलंबन कशाच्या आधारे?
राजकीय आणि सहकार क्षेत्रातील अनुभव, विविध गटांशी समन्वय साधण्याची क्षमता तसेच संचालकांना एकत्र ठेवण्याची हातोटी या बाबींमुळे खासदार संजय देशमुख यांच्या नावाला महत्त्व प्राप्त झाल्याची चर्चा आहे. बँकेच्या कारभारात विविध राजकीय गटांचा सहभाग असल्याने सर्वांना विश्वासात घेणारे नेतृत्व निवडण्यावर भर दिला जाऊ शकतो. त्यामुळे केवळ पक्षीय गणित न पाहता सर्वमान्य चेहऱ्याचा विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, अध्यक्षपदाबाबत अद्याप अंतिम निर्णय झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. युतीच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा होऊन संचालकांचे समर्थन आणि राजकीय नेत्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळे बैठकीतील घडामोडींकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पिक कर्जासाठी ६०० सेवा सहकारी संस्थांना नोटिसा; कर्जमाफीचा लाभ मिळूनही शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांमधील महत्त्वाची संस्था आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच कर्जवसुलीला गती देणे, पात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा करणे आणि ठेवीदारांचा विश्वास कायम राखणे, ही नव्या अध्यक्षासमोरील प्रमुख आव्हाने असतील.
त्यामुळे हे पद केवळ राजकीय प्रतिष्ठेचे न राहता मोठ्या आर्थिक जबाबदारीचे ठरणार आहे. संचालक मंडळात समन्वय राखून बँकेला आर्थिक अडचणींतून बाहेर काढण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वालाच प्राधान्य मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ऑक्टोबरअखेर होणाऱ्या संभाव्य बैठकीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीला दिशा मिळण्याची शक्यता असून, संजय देशमुख यांच्यासह अन्य इच्छुकांच्या नावांबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
____








