MLA Sajid Khan visits a cattle pound and performs puja : गौमातेच्या नावाने राजकारण; पोळ्याला कोंडवाड्यातील गोवंशांची उपेक्षा होत असल्याचा सरकारवर आरोप
Akola गोवंश आणि ‘गौमाता’च्या नावाने राजकारण करून सत्ता मिळविणाऱ्या भाजपला पोळ्याच्या दिवशी महापालिकेच्या कोंडवाड्यात बंदिस्त असलेल्या गोवंशांचा विसर पडल्याचा आरोप पश्चिम अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला. ‘गौमातेच्या नावाने घोषणा करायच्या आणि सत्ता मिळाल्यानंतर मुक्या जीवांकडे ढुंकूनही पाहायचे नाही,’ अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
पोळा हा शेतकरी आणि गोवंशाशी जिव्हाळ्याने जोडलेला सण आहे. जिल्ह्यात सर्वत्र बैलांना सजवून त्यांची पूजा केली जात असताना डाबकी रोड येथील श्रीवास्तव चौक परिसरातील महापालिकेच्या कोंडवाड्यातील गोवंश मात्र बंदिस्त अवस्थेत होते. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गोवंशांना पकडून या कोंडवाड्यात ठेवण्यात आले होते.
पोळ्याच्या दिवशी तरी या गोवंशांची पूजा केली जाईल आणि त्यांना पुरेसा चारा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप आ. पठाण यांनी केला.
‘गौमातेच्या नावाने सत्ता; मग पोळ्याला कुठे गेले गोप्रेम?’
गोवंशाच्या नावाने राजकीय भावनिक वातावरण निर्माण करायचे, मात्र प्रत्यक्ष सत्तेत आल्यानंतर त्याच गोवंशांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करायचे, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप आ. पठाण यांनी केला. गोवंशांप्रती खरोखरच आस्था असेल, तर ती केवळ भाषणांतून नव्हे तर कृतीतून दिसली पाहिजे, असेही त्यांनी सुनावले.
या पार्श्वभूमीवर आ. पठाण यांनी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह थेट महापालिकेचा कोंडवाडा गाठला. तेथे बंदिस्त असलेल्या गोवंशांचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच त्यांना पुरणपोळी आणि चारा देण्यात आला. त्यानंतर गोवंशांची कोंडवाड्यातून सुटकाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोळ्याच्या दिवशी उपेक्षित राहिलेल्या या मुक्या जीवांसोबत काँग्रेसने सण साजरा करून माणुसकीचा संदेश दिल्याची भावना यावेळी आ. पठाण यांनी व्यक्त केली.
मुक्या जीवांची उपेक्षा; राजकारण मात्र ‘गौमाते’च्या नावाने!
गोवंशांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी पोळ्याच्या दिवशी कोंडवाड्यातील गोवंशांची अवस्था पाहावी. घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची असून सत्ता आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुक्या जीवांप्रती संवेदना जपणे गरजेचे आहे, असेही आ. साजिद खान पठाण यांनी म्हटले.








