Manoj Jarange to reach Mumbai on September 19 for maratha reservation demand : मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटणार; महायुती सरकारची डोकेदुखी वाढली
Mumbai मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १७ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील आणि महायुती सरकारमधील चर्चा अखेर निष्फळ ठरली आहे. सरकारला मराठा आंदोलकांची समजूत काढण्यात अपयश आल्याने आता जरांगे यांनी थेट मुंबईवर धडक देण्याचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे-पाटील हे सुरुवातीला १२ सप्टेंबर रोजी मुंबईत येऊन आंदोलन करणार होते. मात्र, प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण किंवा आंदोलन करण्याची परवानगी नाकारली. यावर आक्रमक भूमिका घेत जरांगे यांनी आता सर्व कायदेशीर बंधने आणि प्रशासकीय अडचणी बाजूला सारून १९ सप्टेंबर रोजी मराठा समर्थकांसह मुंबईत धडकण्याचा थेट इशारा दिला आहे. या भूमिकेमुळे राज्य शासन आणि पोलीस प्रशासनावरील ताण चांगलाच वाढला आहे.
Sudhir mungantiwar : पक्षभेदांच्या पलीकडे माणुसकी; मुनगंटीवारांच्या मनगटाला कृतज्ञतेची राखी
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाची मुख्य मागणी संपूर्ण मराठा समाजाला ‘सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र’ देऊन इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्याची आहे. मात्र, सरकारने ही ‘सरसकट’ मागणी तांत्रिक आणि कायदेशीर बाबींमुळे फेटाळून लावली आहे. त्याऐवजी ज्यांच्याकडे जुने पुरावे आणि निजामकालीन दस्तऐवज उपलब्ध असतील, त्यांनाच तपासणीअंती कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.
Amit Shah : ‘त्या’ अर्ध्या तासात नेमकी काय खलबतं? राज्यात चर्चांना उधान
परंतु, जरांगे-पाटील हे सरकारच्या या अटींवर समाधानी नसून सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. १७ दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालवत असूनही ते माघार घेण्यास तयार नाहीत.मनोज जरांगे यांच्या १९ सप्टेंबरच्या मुंबई कूचच्या इशाऱ्यामुळे राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे.
एकीकडे उपोषणकर्त्यांची ढासळती प्रकृती आणि दुसरीकडे मुंबईवर धडकणारा आंदोलकांचा मोर्चा, यामुळे महायुती सरकारसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार आता काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








