व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ravi Rana, Anil Bonde : ‘आजी-माजींना दूर ठेवा’ ते ‘टायगर अभी जिंदा...

Ravi Rana, Anil Bonde : ‘आजी-माजींना दूर ठेवा’ ते ‘टायगर अभी जिंदा है’; अमरावती भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Internal conflicts within Amravati BJP comes out in the open : सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांची रंगत; राणा यांच्या वक्तव्याला बोंडे समर्थकांकडून प्रत्युत्तर

Amravati वरुडचे भाजप आमदार उमेश यावलकर यांच्या दहीहंडी उत्सवातील माजी खासदार नवनीत राणा यांच्या वक्तव्यामुळे अमरावती शहर व जिल्हा भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राणा यांनी कोणाचेही थेट नाव न घेता ‘आजी-माजी’ नेत्यांवर केलेल्या टीकेनंतर भाजपमधील दोन गटांमध्ये सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

‘आजी-माजी कोण हे सगळ्यांनाच माहीत आहे. ज्यांनी स्वतःचे भले केले, मात्र मतदारसंघाचे केले नाही, त्यांना थारा देऊ नका आणि त्यांच्या घरच्यांनाही दूर ठेवा,’ अशा आशयाचे वक्तव्य राणा यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

दरम्यान, खासदार अनिल बोंडे यांच्या समर्थकांकडून आणि फॅन क्लबकडून सोशल मीडियावर ‘टायगर अभी जिंदा है’सह विविध पोस्ट शेअर करण्यात आल्या. काही पोस्टमध्ये थेट ‘औकात’चा उल्लेख करत राणा यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यात आले.

Vidarbha Farmers : पावसाअभावी पिके संकटात; ‘पालकमंत्र्यांनी बांधावर येऊन पाहणी करावी’

महिला पदाधिकाऱ्याच्या टीकेने वाद आणखी वाढला

वरुडमधील भाजप महिला मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने राणा यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाची टीका केली. राणा यापूर्वीही निवडणुकीत पराभूत झाल्या असून, भविष्यातही पराभूत होतील, असा दावा त्यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना राणा यांनी सोशल मीडियावर ‘कितने नादान हैं शहर के जुगनू’ अशी टिप्पणी केली. त्यामुळे आधीच सुरू असलेल्या शाब्दिक वादाला आणखी धार आली.

यावलकरांचा सावध पवित्रा

या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या कार्यक्रमाचे आयोजक आणि वरुडचे आमदार उमेश यावलकर यांनी मात्र सावध भूमिका घेतली. प्रत्येकाची बोलण्याची शैली वेगळी असते आणि अनिल बोंडे हे आमचे नेते आहेत, असे सांगत त्यांनी गैरसमज झाल्याचे स्पष्ट केले.

दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत सक्षम नेतृत्वाकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले. राणा यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबरचा नियोजित मेळावा रद्द करण्याची विनंतीही त्यांनी केली.

दहीहंडी कार्यक्रमातील राणा यांच्या वक्तव्याचे पडसाद आता अमरावती भाजपमध्ये उमटू लागले आहेत. राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर बोंडे समर्थकांकडून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचे जुने छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करून शक्तिप्रदर्शन केले जात आहे.

Uddhav balasaheb thackeray : शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; ठाकरे गटाची मागणी

‘आजी-माजी’ नेत्यांमधील हा शाब्दिक कलगीतुरा आगामी स्थानिक राजकारणात कोणते वळण घेतो, तसेच या प्रकाराची प्रदेश भाजपकडून दखल घेतली जाते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!