Abhijit Deepke in Nagpur over issues concerning Ashram schools; to confront Tribal Development Minister Ashok Uikey : गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील आदिवासी आश्रमशाळांची करणार प्रत्यक्ष पाहणी
Nagpur ‘नीट’ परीक्षेतील घोटाळ्यावरून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सरकारला नमवणारे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजित दीपके आता नागपुरात धडकले असून, गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील आदिवासी आश्रमशाळांची आणि वसतिगृहांची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. साप चावल्यामुळे तीन आदिवासी विद्यार्थ्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि आश्रमशाळांची दयनीय अवस्था या पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके विरोधकांच्या टार्गेटवर आले असून, दीपके यांच्या या दौऱ्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपुरात माध्यमांशी बोलताना दीपके यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. राज्यात एकीकडे पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या गप्पा मारल्या जातात, रोज मोठ्या घोषणा करून ग्रोथ रेटचे दावे केले जातात; मात्र दुसरीकडे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा आणि वसतिगृहे भाड्याच्या इमारतींमध्ये चालवली जातात, ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडे कोट्यवधींच्या प्रकल्पांसाठी पैसा आहे, मग आदिवासींच्या शिक्षणासाठी का नाही असा सवाल उपस्थित करत, आपण कोणाला वैयक्तिक टार्गेट करणार नसलो तरी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून सत्य परिस्थिती समोर आणणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Vijay Wadettiwar : जरांगेंच्या कोणत्या १२ मागण्या पूर्ण केल्या? सरकारने जाहीर करावे
गेल्या काही महिन्यांपासून पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये सुविधांच्या अभावाविरोधात आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत असून, पुण्यात झालेल्या आंदोलनाची दखल स्वतः राहुल गांधी यांनी घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते, ज्यानंतर सरकारला वयोमर्यादेचे नियम शिथिल करावे लागले होते. राजस्थानमध्ये शाळांच्या तपासणीदरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण आणि हाकलून देण्याचा प्रकार घडला होता; मात्र तरीही न डगमगता दीपके यांनी आता आपला मोर्चा सरकारी आणि आदिवासी शाळांकडे वळवला आहे.
आधीच तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना, आता अभिजित दीपके विदर्भातील आश्रमशाळांची पोलखोल करण्यासाठी मैदानात उतरल्याने आदिवासी विकास विभागातील निष्काळजीपणा चव्हाट्यावर येऊन राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.








