व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rohit Pawar : कर्नाटक करू शकतं, महाराष्ट्र सरकार ५ ऑक्टोबरची वाट का...

Rohit Pawar : कर्नाटक करू शकतं, महाराष्ट्र सरकार ५ ऑक्टोबरची वाट का पाहतंय?

rohit-pawar-maharashtra-drought-karnataka-drought-declaration-devendra-fadnavis : रोहित पवारांचा फडणवीस सरकारला थेट सवाल

Mumbai : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात आला असताना दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कर्नाटकच्या दुष्काळ घोषणेचा दाखला देत महाराष्ट्र सरकारला थेट सवाल केला आहे.

“कर्नाटक करू शकतं, तुम्ही का नाही?” असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटक सरकारने २८ ऑगस्ट रोजी १०१ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले होते. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी आणखी २३ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला. त्यामुळे कर्नाटकातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या १२४ झाली आहे. नव्याने घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांसाठी प्रत्यक्ष पाहणी आणि मूल्यांकन करण्यात आल्याचे वृत्त आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील परिस्थितीही गंभीर असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दुष्काळ घोषित करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा का केली जात आहे, असा सवाल त्यांनी सरकारला केला. पवार यांनी पावसाच्या खंडाची आणि पर्जन्यमानातील तुटीची आकडेवारी पुढे करत राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा केला. त्यांच्या मते, अशा परिस्थितीत सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

Devendra Fadnavis : दुष्काळी मदतीचे नियम आजचे आहेत का?; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर घणाघात

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नियमानुसार ५ ऑक्टोबरनंतर दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होणार असली, तरी त्यापूर्वीच मदत आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजना सुरू करण्यात येतील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. एनडीआरएफच्या मदतीपूर्वी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याची तयारी असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

मात्र, सरकारच्या या भूमिकेवर रोहित पवार यांनी समाधान व्यक्त केलेले नाही. परतीच्या पावसामुळे परिस्थितीत काही बदल झाला आणि दुष्काळाची घोषणा टळली, तर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

Chandrashekhar bawankule : येत्या दोनतीन दिवसात दुष्काळावर उपाययोजना; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

शेतकऱ्यांच्या परिस्थितीशी सरकारने कोणत्याही प्रकारे राजकारण करू नये, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. सरकारने दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, आगामी काळात दुष्काळ जाहीर करण्याचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!