Despite notices, 50% of BJP corporators absent from Gadkari-Fadnavis event : पक्षात तीव्र संताप, भाजपमधील अंतर्गत शिस्तीचा बोजवारा
Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याने ४० नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पक्षाच्या या दणक्यानंतर नगरसेवकांमध्ये शिस्त येईल अशी अपेक्षा होती. मात्र, नोटीस मिळूनही या दांडीबहाद्दर नगरसेवकांच्या वर्तनात काहीही बदल झालेला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला तब्बल ५० टक्के भाजप नगरसेवकांनी पुन्हा दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागपूर भाजपमधील अंतर्गत शिस्तीचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्य वाटपाचा पक्षातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री अत्यंत व्यस्त शेड्यूलमधून धावतपळत नागपुरात आले असताना, स्थानिक नगरसेवकांनी मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणे पसंत केले. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी ४० नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. महापालिकेचा निधी वाटप करताना या दांडी मारणाऱ्यांचा विचार केला जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानंत अनेकांनी आजारी होतो, ‘बाहेरगावी होतो अशा सबबी देऊन वेळ मारून नेली होती.
काँग्रेसचे माजी खासदार आले, पण भाजपचे नगरसेवक गायब
शनिवारी पुन्हा त्याच सुरेश भट सभागृहात दिघोरी ते कमाल चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व आमदार, माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, काँग्रेसचे माजी खासदार गेव्ह आवारी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजारी असतानाही निमंत्रणाचा मान राखून कार्यक्रमाला पोहोचले. मात्र, ज्या नगरसेवकांनी पक्षाच्या चिन्हावर विजय मिळवला, त्यातील अर्ध्याहून अधिक नगरसेवकांना पक्षाच्या आणि विकासाच्या या मोठ्या कार्यक्रमासाठी वेळ मिळाला नाही.
भाजप हा अत्यंत शिस्तप्रिय आणि पक्षादेश मानणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र, महापालिकेत सलग सत्ता मिळाल्याने नगरसेवकांमध्ये मिजास आली आहे का? असा रोखठोक सवाल आता भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते विचारू लागले आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी नितीन गडकरींच्या खामल्यातील कार्यालयाबाहेर दिवस-दिवसभर ताटकळत उभे राहणारे नगरसेवक आता पक्षाच्याच प्रमुख नेत्यांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवत असल्याने पक्षात प्रचंड असंतोष आणि रोष निर्माण झाला आहे.
वरिष्ठ नेते घेणार निर्णय: बाल्या बोरकर
या संपूर्ण प्रकारावर महापालिकेतील भाजपचे सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ५० टक्के नगरसेवक अनुपस्थित असल्याची बाब मान्य केली. बोरकर म्हणाले, अनेक नगरसेवक कार्यक्रमाला आले नव्हते हे खरे आहे. अनुपस्थित नगरसेवकांची नावे सध्या माझ्याकडे उपलब्ध नाहीत, परंतु पक्षातर्फे या सर्व दांडीबहाद्दर नगरसेवकांची नोंद घेतली जात आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची, याचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील.








