BJP MLA takes a dig at Rahul Gandhi, says, “It’s time to call him a joker : पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील मिमिक्रीवरून केली टीका
Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करताना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या मिमिक्रीवर भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांना पूर्वी ‘पप्पू’ म्हणून ओळखले जायचे, पण आता त्यांना ‘जोकर’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशा अत्यंत तिखट शब्दांत परिणय फुके यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील सभा आटोपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार फुके म्हणाले, विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, जेव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, तेव्हा देशाची बदनामी होणार नाही याची काळजी आजवरच्या सर्वच जबाबदार नेत्यांनी घेतली होती. राहुल गांधी मात्र याला अपवाद आहेत. परदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी कशी करता येईल, अशी भाषणे ते देतात. आता तर त्यांनी पंतप्रधान मोदींची मिमिक्री करणेही सुरू केले आहे. त्यामुळे जनतेने आता त्यांना पप्पू ऐवजी जोकर समजायचे का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
देशाच्या आर्थिक आणि जागतिक प्रगतीचा पाढा वाचताना फुके म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येऊन गेले, ही भारताच्या वाढत्या जागतिक सामर्थ्याची पावती आहे. जागतिक पातळीवर युद्धाची परिस्थिती असतानाही भारताने सर्वोच्च जीडीपी दर नोंदवला आहे. ६० वर्षे देशात काँग्रेसची सत्ता होती, परंतु मोदींच्या अवघ्या १२ वर्षांच्या कार्यकाळात झालेला विकास आश्चर्यकारक असून संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या अर्थव्यवस्थेकडे लागले आहे. देशाचा होत असलेला विकास काँग्रेसला सहन होत नाही. त्यामुळे देशाची प्रगती रोखण्याचाच सूर राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाच्या वक्तव्यातून सतत दिसून येतो, असा घणाघाती आरोपही आमदार परिणय फुके यांनी या वेळी केला.








