supriya-sule-on-election-commission-gyanesh-kumar-resignation-sir-row ; ‘कुणावर विश्वास ठेवावा?’ म्हणत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरही भाष्य
New Delhi : केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या वृत्तामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णय प्रक्रियेवर दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर चिंता व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगातील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी, ‘कुणावर विश्वास ठेवावा?’ असा सवाल उपस्थित केला. हा केवळ राजकीय पक्षांचा प्रश्न नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित विषय असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेबाबतच प्रश्न उपस्थित होत असतील, तर सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलावून तातडीने चर्चा करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी सांगितले
Teachers constituency election : ‘पैठणी पॅटर्न’ने गाजली होती २०२०ची निवडणूक; यंदाचे प्लानिंग काय?
उपलब्ध वृत्तांनुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादी, एसआयआर प्रक्रिया, मतदार नोंदणी तसेच निवडणूक आयोगाच्या डिजिटल यंत्रणेच्या कार्यपद्धतीशी संबंधित काही निर्णयांवर आक्षेप नोंदविल्याचे समोर आले आहे. या आक्षेपांची संख्या गेल्या दहा महिन्यांत १४ असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोगाशी संबंधित सूत्रांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. एसआयआरसह आयोगाचे सर्व निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने एकमताने घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आयोगातील कथित मतभेदांच्या स्वरूपावर सध्या परस्परविरोधी दावे समोर येत आहेत.
ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला. देशातील प्रत्येक नागरिकाला समान मतदानाचा अधिकार संविधानाने दिला असून, त्या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, एसआयआर प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीच्या पुनरावलोकनावरूनही वाद सुरू आहे. नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म-६ मध्ये एसआयआरशी संबंधित अतिरिक्त माहिती मागविण्याच्या बदलावर दोन आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे.
Teachers constituency election : महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर निर्बंध; आमसभेवरही परिणाम?
या संपूर्ण प्रकरणावर इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी संकेत दिले. सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली. याचवेळी महाराष्ट्रातील शेतकरी प्रश्नावरही सुळे यांनी सरकारकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याचे स्वागत करत, या दौऱ्यांनंतर शेतकऱ्यांच्या पदरात ठोस मदत पडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुष्काळ आणि शेतीच्या संकटाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.








