2020 Teachers’ Constituency election made headlines with its Paithani pattern : शिक्षक मतदारसंघात दिवाळीपूर्वीच उडणार राजकीय फटाके; २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज
Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची २०२० ची निवडणूक ‘पैठणी पॅटर्न’ने गाजवली होती. यंदा उमेदवार काय प्लानिंग करतात आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची तयारी देखील जोरात सुरू झाली आहे.
पैठणी पॅटर्नने २०२० ची अख्खी निवडणूक पलटवून लावल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या निवडणुकीत विजयी झालेले किरण सरनाईक यांनी शिक्षकांना पैठणी आणि बॅग वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचाच त्यांना फायदा झाल्याचा दावा पराभूत उमेदवारांनी केला होता. यंदा कोणत्या पॅटर्नने निवडणूक गाजते, याकडे लक्ष लागलेले आहे.
२०२० मध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी ही निवडणूक जिंकली होती. त्यापूर्वी १९९०-९६ या कालावधीत वसंतराव मालधुरे, १९९६-२००२ दिवाकरराव पांडे, २००२-०८ आणि २००८-१४ या दोन्ही कालावधीत वसंतराव खोटरे, तर २०१४-२०२० या कालावधीत श्रीकांत देशपांडे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने यंदा दिवाळीपूर्वीच या मतदारसंघात राजकीय फटाके उडणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा या पाचही जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने प्रशासकीय यंत्रणेची लगबग वाढली असून, राजकीय वर्तुळातील हालचालींनाही वेग आला आहे.
या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त नयना गुंडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. विभागातील पाचही जिल्हाधिकारी तसेच मुख्यालयाचे अपर आयुक्त संजय जाधव हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
३३,९६४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सन २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ३५,६२२ मतदार होते. यंदा ही संख्या ३३,९६४ इतकी आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ९,५९२ मतदार असून, बुलढाणा जिल्ह्यात ८,६९०, यवतमाळ ६,५४७, अकोला ५,६२१ आणि वाशिम जिल्ह्यात ३,५१४ मतदार आहेत.
मतदार यादीचा कार्यक्रम फेब्रुवारी २०२६ मध्ये पूर्ण झाला. अंतिम यादीतील आठ मतदार वगळल्यानंतर ३३,००९ मतदार होते. त्यानंतर ९५६ मतदारांची नव्याने नोंद झाली. त्यामुळे सध्या एकूण ३३,९६४ मतदार नोंदणीकृत आहेत. नव्याने नोंद झालेल्या मतदारांचा समावेश पुरवणी यादीत करण्यात येणार आहे.
Prakash ambedkar: विरोधी पक्ष कोमात, भाजपचे इस्रायलवर उघड प्रेम; प्रकाश आंबेडकर यांची टीका
असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होईल, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार असून, मतमोजणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग येणार असून, दिवाळीपूर्वीच अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.








