Drought-hit farmer breaks down in tears before Eknath Shinde : पावसाअभावी पाच एकरांतील सोयाबीन-तुरीचे नुकसान; व्याळा येथे समाधान सुरकर यांनी मांडली व्यथा
Akola पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. बाळापूर तालुक्यातील व्याळा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना समाधान सुरकर यांनी आपल्या शेतीची व्यथा मांडली. परिस्थिती सांगताना ते भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
समाधान सुरकर यांची बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथे सुमारे पाच एकर शेती आहे. त्यांनी शेतात सोयाबीन आणि तुरीची लागवड केली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतातील वाळून गेलेली पिके दाखवत त्यांनी आपली परिस्थिती शिंदे यांच्यासमोर मांडली.
Teachers constituency election : ईव्हीएम नाही, ‘नोटा’ नाही, निवडणूक खर्चावर मर्यादाही नाही
‘आत्महत्येचा विचार मनात आला होता’
शेतीच्या नुकसानीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींबाबत बोलताना सुरकर भावुक झाले. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, असे त्यांनी सांगितले. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर हा विचार मनातून दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. ही व्यथा मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले.
सुरकर यांची व्यथा ऐकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना धीर दिला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतातील पिकांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.
अकोल्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा
IIT Student Stress : आयआयटीतील विद्यार्थ्यांचे मृत्यू प्रश्न शिक्षणव्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा !
अकोला जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. व्याळा आणि दधम परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शिंदे यांनी विदर्भातील इतर दुष्काळग्रस्त भागांचाही दौरा केला. शेतकऱ्यांनी पावसाची कमतरता, पिकांचे नुकसान आणि शेतीवरील वाढता खर्च याबाबत आपल्या अडचणी मांडल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करत आहेत. फडणवीस आणि शिंदे यांच्या दौऱ्यांत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यावर भर देण्यात आला आहे.
पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पिकांचे पंचनामे आणि पुढील उपाययोजनांकडे आता लक्ष लागले आहे.








