Teachers’ Constituency election: No EVMs, no ‘NOTA’, and no limit on election expenditure : अमरावती शिक्षक मतदारसंघात २६ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी; ३३,९६४ मतदारांची नोंद
Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. या तारखेपर्यंत पात्र ठरणाऱ्या मतदारांचा समावेश निवडणुकीच्या मतदार यादीत केला जाणार असून, २७ सप्टेंबरपर्यंत मतदारसंख्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघात ३३ हजार ९६४ मतदारांची नोंद आहे. अमरावती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी बुधवारी ही माहिती दिली.
भारत निवडणूक आयोगाने अमरावतीसह महाराष्ट्रातील पाच विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २९ सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी ७ ऑक्टोबरला, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २७ ऑक्टोबरला होणार आहे.
मतदारसंख्या वाढल्यास मतदान केंद्रेही वाढणार
मतदारांची अंतिम संख्या निश्चित झाल्यानंतर पुढील एक-दोन दिवसांत मतदान केंद्रांची संख्या आणि यादी जाहीर केली जाणार असल्याचे नयना गुंडे यांनी सांगितले. मागील निवडणुकीत ३५ हजार ६२२ मतदारांसाठी ७७ मतदान केंद्रे होती. यावेळी मतदारसंख्येनुसार मतदान केंद्रे निश्चित केली जातील.
IIT Student Stress : आयआयटीतील विद्यार्थ्यांचे मृत्यू प्रश्न शिक्षणव्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा !
मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी शक्यतो १६ किलोमीटरपेक्षा अधिक अंतर प्रवास करावा लागू नये, यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ईव्हीएम नाही; ‘नोटा’चाही पर्याय नाही
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर केला जात नाही. मतपत्रिकेवर मतदान केले जाते. तसेच या निवडणुकीत ‘नोटा’ (None of the Above) हा पर्याय उपलब्ध नसतो.
उमेदवाराच्या निवडणूक खर्चावरही मर्यादा नसल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला १० हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराला ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
पाच जिल्ह्यांमध्ये प्रशासनाची यंत्रणा सज्ज
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाचही जिल्ह्यांतील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी निवडणूक प्रक्रियेत विविध जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. अपर आयुक्त संजय जाधव हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने या मतदारसंघात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. राजकीय पक्षांनी प्रचार सभा, रॅली आणि अन्य प्रचार कार्यक्रमांमध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
– २९ सप्टेंबर — निवडणूक अधिसूचना
– ६ ऑक्टोबर — उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
– ७ ऑक्टोबर — अर्जांची छाननी
– ९ ऑक्टोबर — अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
– २३ ऑक्टोबर — मतदान
– २७ ऑक्टोबर — मतमोजणी








