Farmers warn of an indefinite hunger strike outside Bachchu Kadu’s residence : २८ सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा; २०२३ पासून पीक कर्जासाठी त्रास होत असल्याचा आरोप
Amravati तालुक्यातील पोही येथील पात्र शेतकऱ्यांना सहकारी सोसायटी आणि बँकेच्या कथित मनमानी कारभारामुळे पीक कर्जापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जप्रकरणांवर सह्या करण्यास टाळाटाळ करणे, सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा नोंदवून प्रत्यक्ष कर्ज वितरित न करणे तसेच सिबिल अहवालाची अट लावण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या घरासमोर २८ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात राहुल गाठे, अमोल बदरके, प्रफुल्ल ठाकरे, स्वप्निल माकोने, आकाश मते यांच्यासह पोही येथील शेतकऱ्यांनी जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनानुसार, पोही येथील सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष दिलीप वढाळे आणि सचिव उमेश डायलकर यांनी २०२३ पासून शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या प्रस्तावांवर सह्या करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कर्जासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून, आर्थिक अडचणी वाढल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
कर्ज न देता सातबाऱ्यावर बोजा?
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा नोंदविण्यात आला; मात्र प्रत्यक्षात कर्जाची रक्कम वितरित करण्यात आली नाही. त्यामुळे इतर बँकांकडूनही कर्ज मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सिबिलच्या अटीवरही आक्षेप
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणात स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही बँकेकडून सिबिल अहवालाची अट लावण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पीक कर्जासाठी पात्र असूनही विविध कारणांमुळे कर्ज मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Teachers constituency election : ईव्हीएम नाही, ‘नोटा’ नाही, निवडणूक खर्चावर मर्यादाही नाही
या सर्व प्रकरणाची चौकशी करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास २८ सप्टेंबरपासून आमदार बच्चू कडू यांच्या घरासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.








