पावसात खंड, पिकांचे नुकसान; पूर्व विदर्भात दुष्काळाची दाहकता वाढली
Nagpur सप्टेंबर महिना उजाडला तरी राज्यातील अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जुलै महिन्यात काही प्रमाणात समाधानकारक पाऊस झाल्याचा अपवाद वगळता पावसाळ्यातील उर्वरित कालावधीत पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामावर मोठे संकट आले आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट, मोठे खंड आणि पिकांचे नुकसान यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील ३३६ महसूल मंडळांपैकी १८ मंडळांमध्ये सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस नोंदवला गेला आहे. त्याचवेळी २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडलेल्या मंडळांची संख्या १५० पेक्षा जास्त असल्याचे अहवालात समोर येत आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होत आहे.
नागपूर जिल्ह्यात दुष्काळाची छाया अधिक गडद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५३६ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या सुमारे ६५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसातील मोठ्या खंडामुळे कापूस, सोयाबीन, धान, भाजीपाला आणि फळबागांना फटका बसला आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या अहवालानुसार २५ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा आणि मोसंबी बागांचे नुकसान झाले असून, फळगळ आणि दुष्काळी परिस्थितीचा फटका ३२ हजार ५८९ शेतकऱ्यांना बसल्याचे समोर येत आहे. ऑगस्टमध्ये दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने जिल्हा दुष्काळाच्या निकषांच्या कक्षेत येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
चंद्रपूरमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील चार महसूल मंडळांमध्ये केवळ २५ ते ५० टक्के पाऊस झाला, तर ४८ मंडळांमध्ये ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद आहे. सरासरीच्या तुलनेत सुमारे ६५ टक्के पाऊस झाल्याने धान, सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय अतिवृष्टीमुळेही जिल्ह्यातील १२६ गावांमधील १० हजार ७९५ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
वर्धा जिल्ह्यात पावसाची तूट आणखी स्पष्टपणे दिसून येते. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३४ टक्के पावसाची कमतरता आहे. ५५ महसूल मंडळांपैकी ४० मंडळांमध्ये सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नऊ मंडळांमध्ये तब्बल २१ दिवसांचा पावसाचा खंड, तर सहा मंडळांमध्ये १८ ते २० दिवसांचा खंड नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीवरून राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी होत असताना, सरकारकडून नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या संदर्भातील पहिली अधिसूचना तीन दिवसांत काढण्याची घोषणा केली असून, केंद्राच्या मदतीची प्रक्रिया सुरू असली तरी त्याची प्रतीक्षा न करता राज्याकडून आवश्यक उपाययोजना करण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. पीक नुकसान, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता यावरही प्रशासनाकडून लक्ष केंद्रित केले जात आहे. पूर्व विदर्भात मात्र आता प्रश्न केवळ पावसाचा राहिलेला नाही. पावसातील तूट, दीर्घ खंड, फळबागांचे नुकसान आणि खरीप उत्पादनातील संभाव्य घट यामुळे शेतकऱ्यांसमोर पुढील काळातील आर्थिक संकटाचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरसह संपूर्ण पूर्व विदर्भासाठी शासनाच्या दुष्काळी उपाययोजना आणि प्रत्यक्ष मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.








