नागपुरातून दिलं थेट आव्हान; नव्या विषयावर राजकारण
Nagpur केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके आता भाजपच्या थेट निशाण्यावर आले आहेत. शिवाजी पार्क येथील आंदोलनादरम्यान दीपके यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून भाजपचे नेते व अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत दीपके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा आंबेडकरी जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा दिला आहे.
शुक्रवारी मुंबईत सीजेपीच्या आंदोलनात बोलताना दीपके यांनी पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, असे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेत अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी संताप व्यक्त केला. मेश्राम म्हणाले, काँग्रेसने हयातभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा छळ केला, त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याचे कुभांड रचले आणि संसदेचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले. अशा काँग्रेसच्या नेहरूंना डॉ. बाबासाहेबांच्या रांगेत आणून बसवणे हा महामानवाचा आणि संविधानाचा घोर अपमान आहे. नेहरू आणि डॉ. बाबासाहेबांची तुलना कधीही होऊच शकत नाही.
मेश्राम यांनी दीपके यांच्या हेतूवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील लोकशाही आणि संवैधानिक संस्था मजबूत केल्या. मात्र, त्याच संस्थांच्या विरोधात आंदोलन करून तरुणांना वाममार्गाला लावण्याचे कारस्थान दीपके करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
दीपके हे सर्व नेमके कोणाच्या इशाऱ्यावर करत आहेत, त्यांच्या मागे कोणती अदृश्य शक्ती काम करतेय याचा शोध लवकरच लावला जाईल. देशातील जेन झी तरुणाईने दीपके यांचा हा राजकीय डाव वेळीच ओळखावा, असे आवाहनही मेश्राम यांनी केले.
मनपातील ‘पदोन्नती’ प्रकरणात आयुक्तांना २४ तासांचा अल्टिमेटम!
भाजपनेही विरोधी पक्षात असताना अनेक आंदोलने केली, पण आमचा केंद्रबिंदू नेहमी जनहित राहिला. निवडणुकीत पराभव झाल्यावर भाजपने कधीही ईव्हीएमवर खापर फोडले नाही किंवा मतचोरीचे रडगाणे गायले नाही. उलट पराभवानंतर दुप्पट ताकदीने जनतेच्या प्रश्नांवर काम केले. दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संविधान मान्यच नाही, म्हणूनच ते आज संवैधानिक संस्थांवर हल्ले करत आहेत. आता नागपुरातून मिळालेल्या इशाऱ्यानंतर दिपके काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








