कव्वालीच्या कार्यक्रमातील वादावरून हाणामारी; मृतांमध्ये एक नगरसेवक?
Buldhana देऊळगाव राजा शहरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील वादाला सोमवारी रात्री हिंसक वळण लागले. कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान दोन्ही गटांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देऊळगाव राजा परिसरात सोमवारी रात्री कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध राजकीय गटांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील काही पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला.
सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढत जाऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या तुंबळ हाणामारीत काही जण गंभीर जखमी झाले.
दोघांचा मृत्यू
या घटनेत शिवसेना शिंदे गटाशी संबंधित अनवर शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता आरिफ शेख यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांपैकी एक जण नगरसेवक असल्याचेही समोर आले आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळणे बाकी आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
अमरावतीत काँग्रेसच्या उमेदवाराला ठाकरेंचे आव्हान, तरीही सपकाळ म्हणतात ‘मित्रपक्ष आमच्यासोबत’
नेमके कारण अद्याप अस्पष्ट
कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातूनच हा हिंसक संघर्ष झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, वाद नेमका कोणत्या कारणावरून सुरू झाला, तसेच हाणामारीत नेमके कोण सहभागी होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि हाणामारीस जबाबदार व्यक्तींची माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.








