जिल्हा बँक निवडणुकीत न्यायालयीन आदेशाने आडे यांचे नामनिर्देशन रद्द
Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आर्णी तालुका गटातील महायुतीच्या राजकीय रणनीतीला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केलेले महायुतीचे उमेदवार अनिल आडे यांचे नामनिर्देशन पत्र न्यायालयीन आदेशानुसार रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, न्यायालयाचा अधिकृत आदेश प्राप्त झालेला नसल्याने निवडणूक प्रक्रियेतील पुढील हालचालींबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
आर्णी तालुका गटातून अनिल आडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ते तालुक्यातील एका सहकारी संस्थेचे संचालक असून दुसऱ्या संस्थेतून प्रतिनिधित्व करत असल्याचा मुद्दा मनीष पाटील यांनी उपस्थित केला होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी लागू असलेल्या पात्रता निकषांचा आधार घेत पाटील यांनी आडे यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती.
‘शेतकरी वाचला तर महाराष्ट्र वाचेल’ म्हणत वडेट्टीवारांचा आंदोलनाचा इशारा
मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर मनीष पाटील यांचा आक्षेप फेटाळून लावत अनिल आडे यांचे नामनिर्देशन कायम ठेवले होते. त्यामुळे आडे यांचा निवडणूक मार्ग मोकळा झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु पाटील यांनी हा निर्णय मान्य न करता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयीन सुनावणीनंतर मनीष पाटील यांचा आक्षेप ग्राह्य धरला गेला आणि त्यानुसार अनिल आडे यांचे नामनिर्देशन रद्द करण्याची प्रक्रिया पुढे आली.
या निर्णयामुळे आर्णी तालुका गटातील निवडणुकीचे राजकीय गणितच बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीपासून चर्चेत असलेले हे प्रकरण आता थेट न्यायालयीन निर्णयापर्यंत पोहोचले. त्यामुळे महायुतीच्या गोटातही राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
तपासणीसाठी गेलेल्या दक्षता पथकासह आमदार पोहोचले पोलीस ठाण्यात!
विशेष म्हणजे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर अनिल आडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे महायुतीच्या व्यापक राजकीय समीकरणाचा भाग म्हणून पाहिले जात होते. मात्र, उमेदवारीच रद्द झाल्याने महायुतीसमोर आता आर्णी तालुका गटात नव्याने राजकीय रणनीती आखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
न्यायालयीन निर्णयामुळे आर्णी तालुका गटातील सहकार क्षेत्रातील राजकारण चांगलेच तापले असून, पुढील काळात कोणते राजकीय डावपेच आखले जातात, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








