व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या बँक काबीज केली, आता अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच

बँक काबीज केली, आता अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच

यवतमाळ जिल्हा बँकेत राजकीय समीकरणांची कसोटी, नेत्यांपुढे मोठा प्रश्न

Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे. निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा जिंकत बँकेवरील वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी अध्यक्षपदाचा निर्णय अद्याप बाकी आहे. महायुतीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप या तीन पक्षांचा समावेश असल्याने अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. जागांच्या संख्येत शिंदेसेना आघाडीवर, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर असल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत संख्याबळासोबतच राजकीय समीकरणांचीही कसोटी लागणार आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक मर्यादित मतदारसंख्या असूनही चांगलीच चर्चेत राहिली. निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्याने अध्यक्षपदावर याच गटातील संचालकाची निवड होण्याचे जवळपास निश्चित आहे. मात्र, महायुतीतील तिन्ही पक्षांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आणि अंतर्गत समन्वय यामुळे अध्यक्षपदाचा निर्णय कसा घेतला जातो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सोले यांच्या माघारीचा सर्वाधिक फायदा कोणाला?; नाना पटोले यांचा दावा

अध्यक्षपदाच्या निवडीची सभा कधी आयोजित केली जाते आणि उमेदवारीबाबत कोणते सूत्र निश्चित होते, याकडे नवनिर्वाचित संचालकांसह राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. शिंदेसेनेचे संख्याबळातील आघाडीचे स्थान अध्यक्षपदासाठी कितपत निर्णायक ठरते, तसेच राष्ट्रवादी आणि भाजपची भूमिका काय राहते, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र, अध्यक्षपदासाठी अंतिम निर्णय झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नूतन संचालकांचा आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. जितेंद्रसिंह गोरमनगर, तृप्ती पाटील, राम देवसरकर, अरविंद भुरे, राजीव येल्टीवार, किरण देरकर, राहुल ठाकरे, स्वाती येंडे आणि सुनील कातकडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणवाढीचा प्रश्न प्रलंबित; दसऱ्यापर्यंत अल्टिमेटम

महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे विजय मिळविणे शक्य झाल्याची भावना नूतन संचालकांनी व्यक्त केली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच सहकार क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च प्राधान्याने जपून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष ॲड. सचिन नाईक, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बाबासाहेब गाडे पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, प्रदेश सरचिटणीस अशोक बोबडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जितेंद्र मोघे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अमरावतीच्या सहकार विभागात चाललंय तरी काय?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांचा महत्त्वाचा आधार मानली जाते. पीककर्ज वितरण, आर्थिक सहाय्य आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणात बँकेची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची निवड होते, यासोबतच नव्या नेतृत्वाकडून शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडेही लक्ष राहणार आहे.

निवडणुकीतील यशानंतर आता अध्यक्षपदाची निवड ही महायुतीसमोरील महत्त्वाची राजकीय कसोटी ठरणार आहे. संख्याबळाच्या जोरावर शिंदेसेना बाजी मारणार, राष्ट्रवादी आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करणार की भाजपच्या वाट्याला महत्त्वाची जबाबदारी येणार, याचे उत्तर अध्यक्षपदाच्या निवड सभेतूनच मिळणार आहे.
____

 

error: Content is protected !!