पदवीधर निवडणूक जिंकल्याचा आविर्भाव; घटक पक्षांत तीव्र संताप, कोहळेंविरुद्ध धुसफूस वाढली
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जिंकलोच अशा आविर्भावात वावरणाऱ्या भाजपच्या मनमानी कारभारावर महायुतीतील घटक पक्ष उघडपणे नाराज झाले आहेत. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारकामात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आरपीआय (आठवले) यांच्या पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. प्रचारासाठी ना साहित्याची विचारपूस, ना रसद पुरवठा; फक्त ‘फोटोसेशन’पुरतेच बोलावून गृहीत धरले जात असल्याचा घणाघाती आरोप करत घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात संतापाचा काढला आहे.
भाजपने आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात आलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती मिळवून भाजपने राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या १५ दिवसांत आरपीआयच्या एकाही कार्यकर्त्याला साधी विचारपूसही केली नव्हती, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे. जाहीरनामा प्रकाशनाच्या वेळी आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत चार हास्यकविता सादर करत वेळ मारून नेली असली, तरी आरपीआयच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी आजही कायम आहे.
भाजप धास्तावली, खाजगी शैक्षणिक संस्थांवर दबाव; शिक्षकांना धमक्या
राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल १२ हजार पदवीधरांची मतदार नोंदणी केल्याचा दावा केला आहे. मात्र, पक्ष कार्यकर्त्यांना साधी सन्मानाची वागणूकही दिली जात नसल्याने शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी बैठकीत जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीनंतर जाहीरनामा प्रकाशनाला शहर, जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांना केवळ औपचारिकतेसाठी बोलावण्यात आले.
शिवसेनेचीही अशीच कोंडी करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजताच्या कार्यक्रमाचे निमंत्रण सकाळी १० वाजता धाडण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी खासदार कृपाल तुमाने आणि राजू हरणे हे दोनच नेते उपस्थित राहू शकले. घटक पक्षांचे नेते मंचावर हजेरी लावून फोटो काढण्यापुरतेच थांबले आणि तत्काळ निघून गेले.
‘महायुतीचे डोळे गोट्या खेळण्याइतके सोपे नाहीत’; एकनाथ शिंदेंचा वडेट्टीवारांना पलटवार
विदर्भातील सहा जिल्ह्यांत पसरलेल्या या मोठ्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी आवश्यक असलेले प्रचार साहित्य आणि रसद भाजपकडून अजिबात दिली जात नसल्याचा थेट आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीतही भाजपने महायुतीचा शब्द देऊन आम्हाला गुंतवून ठेवले आणि शेवटच्या क्षणी युती तोडून आमची तारंबळ उडवली होती. पदवीधरमध्ये आमचा उमेदवार नव्हता, तरीही आम्हाला केवळ गृहीत धरून अपमानित केले जात आहे, असा संताप एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केला.
मागील निवडणुकीत भाजपला त्यांचा अति-आत्मविश्वासच नडला होता आणि पराभव पत्करावा लागला होता. आता पुन्हा एकदा मतदानापूर्वीच जिंकल्याच्या स्वप्नांत भाजप वावरत असल्याने
महायुतीतील ही अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा महाग पडणार का, असा रोखठोक सवाल उपस्थित केला जात आहे.








