व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण मुनगंटीवार म्हणाले, पदवीधरांचा हुंकार विधानपरिषदेत घुमवा, सुधाकर कोहळेंना बहुमताने निवडून द्या !

मुनगंटीवार म्हणाले, पदवीधरांचा हुंकार विधानपरिषदेत घुमवा, सुधाकर कोहळेंना बहुमताने निवडून द्या !

‘संवाद सेतू’तून मतदारांशी साधला संवाद; शिक्षण, रोजगार आणि शैक्षणिक न्यायहक्कांसाठी खंबीरपणे लढण्याची ग्वाही

Chandrapur : शिक्षण, रोजगार आणि पदवीधरांच्या भविष्याशी निगडित प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी सक्षम प्रतिनिधी निवडणे ही पदवीधर मतदारांची महत्त्वाची जबाबदारी आहे. पदवीधरांचे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पदवीधरांचा हुंकार विधानपरिषदेत घुमवा, यासाठी नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना येत्या २३ ऑक्टोबर रोजी बहुमताने निवडून द्या, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर येथील सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये आयोजित ‘संवाद सेतू’ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पदवीधर मतदारांशी संवाद साधताना मुनगंटीवार यांनी शिक्षणाच्या संधी, रोजगाराचे प्रश्न आणि पदवीधरांच्या शैक्षणिक हक्कांचे महत्त्व अधोरेखित केले.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असून, भारतीय संविधानाने विधानपरिषदेच्या माध्यमातून पदवीधरांना स्वतंत्र प्रतिनिधित्वाची संधी दिली आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. पदवीधरांचा प्रतिनिधी हा केवळ सभागृहातील सदस्य नसतो, तर शिक्षणासह समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करून शासनाला आवश्यक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणारा महत्त्वाचा दुवा असतो.

‘ना साहित्य, ना रसद’; भाजपला अति-आत्मविश्वास, शिवसेना, राष्ट्रवादीला सोडले वाऱ्यावर

मतदान करताना जात-पात आणि धर्म यांपलीकडे जाऊन उमेदवाराची कार्यक्षमता, अनुभव आणि जनतेचे प्रश्न मांडण्याची क्षमता तपासावी, असे आवाहन त्यांनी केले. सुधाकर कोहळे यांना विधानसभेतील कामकाजाचा अनुभव असून, त्यांना संधी मिळाल्यास पदवीधरांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिक्षण हे व्यक्तीच्या प्रगतीचे आणि समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगताना मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. अर्थमंत्री असताना चंद्रपूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मूल येथे कृषी महाविद्यालय आणले, तर महिलांच्या उच्च शिक्षणासाठी ५० एकर जागेत एसएनडीटीचे केंद्र उभारले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला मान्यता मिळवून देण्यात आली असून, पुढील वर्षी बीडीएस महाविद्यालय सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर व्हावेत आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना उज्ज्वल भविष्य घडवता यावे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या शैक्षणिक न्यायहक्कांसाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाहीही मुनगंटीवार यांनी दिली.

आमदारच आंदोलने करणार असतील तर वंजारी यांना मते कशासाठी द्यायची

 

येत्या २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक पात्र पदवीधर मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा. मतदान करताना मत अवैध ठरणार नाही, याची काळजी घेऊन मतदानाची प्रक्रिया अचूकपणे पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, संचालक अंकिता आंबटकर, प्राचार्य लियाकत अली, शोभना, राजदा सिद्दिकी, जमीर शेख आणि नागाराजू यश बांगडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

___

 

error: Content is protected !!