चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Chandrapur दुष्काळाची झळ केवळ शेतातील पिकांना बसत नाही, तर ती शेतकऱ्याच्या संसाराला, पशुधनाच्या अस्तित्वाला आणि संपूर्ण ग्रामीण जनजीवनाला होरपळून टाकते. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत त्यांच्या प्रश्नांना प्रशासनाच्या केंद्रस्थानी आणणे, हीच लोकप्रतिनिधीच्या संवेदनशीलतेची खरी कसोटी असते. शेतकऱ्यांना केवळ तात्पुरत्या मदतीचा दिलासा नव्हे, तर त्यांच्या शिवारात पाणी, पशुधनासाठी चारा-पाणी आणि शेतीला शाश्वत सिंचनाची व्यवस्था मिळावी, या भूमिकेतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर पुढाकार घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी जलसंधारण, बंद विहिरींचे पुनरुज्जीवन, अखंडित वीजपुरवठा, जलजीवन मिशनच्या योजनांची पूर्तता आणि दुष्काळ निवारणासाठी निधीच्या प्रभावी वापरासह विविध उपाययोजनांचा आग्रह धरला. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ मांडण्यापुरत्या मर्यादित न ठेवता त्यावर ठोस आणि दीर्घकालीन उपाय शोधण्याचा त्यांचा प्रयत्न, दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाची संवेदनशीलता अधोरेखित करणारा आहे.
मुनगंटीवारांचा पुढाकार अन् बल्लारपूर, जिवती, ब्रह्मपुरी आले दुष्काळग्रस्तांच्या यादीत
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, खासगी पाणी व्यवस्थापन आणि सिंचन या तीन बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. भविष्यात दुष्काळाची तीव्रता वाढली तरी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील गावांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यादृष्टीने दीर्घकालीन नियोजन करण्याचे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले . जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता खनिज विकास निधीतील ५० टक्के निधी दुष्काळ निवारणाच्या कामांसाठी खर्च करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली.
बंद पडलेल्या विहिरींची साफसफाई करून त्यांचे पुनरुज्जीवन करणे, विहिरी व बोअरवेलची सद्यःस्थिती तपासणे, विहिरींच्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करणे तसेच मनरेगा व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले. पावसाचे पाणी अडविणे आणि जिरविणे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे व पाण्याचा काटेकोर वापर सुनिश्चित करणे, यावर त्यांनी भर दिला.
शेतकरी संकटात तर मुनगंटीवार सर्वांत पहिले मैदानात; समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा
मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर आणि चंद्रपूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. दुष्काळी परिस्थितीत शेतीला पाणी मिळणे ही केवळ शेतीच्या उत्पादनाची बाब नसून शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाशी जोडलेली गरज आहे. त्यामुळे सिंचनाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे, असे आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची सद्यःस्थिती आणि त्यातील अडचणी जाणून घेताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जलजीवन मिशनच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत एकूण १,३०२ योजना असून त्यापैकी ६५० योजना सुरू असल्याची माहिती त्यांनी चर्चेदरम्यान नमूद केली.बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पाणीपुरवठा योजनांची सद्यःस्थिती, अपूर्ण कामे, तांत्रिक अडचणी आणि आवश्यक निधी याबाबत चार दिवसांच्या आत सविस्तर माहिती सादर करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. तांत्रिक कारणांमुळे कोणतीही पाणीपुरवठा योजना बंद राहणार नाही, याची दक्षता घेण्यावर त्यांनी भर दिला. योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल, असेही आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
मुनगंटीवार म्हणाले, पदवीधरांचा हुंकार विधानपरिषदेत घुमवा, सुधाकर कोहळेंना बहुमताने निवडून द्या !
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची खंडित झालेली वीजजोडणी तातडीने पूर्ववत करण्याची मागणी करतानाच, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जुनी व थकीत वीजबिले भरण्यासाठी दुष्काळ संपेपर्यंत मुदतवाढ देण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही आ.मुनगंटीवार यांनी सांगितले. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर विभागांमध्ये समन्वय साधून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
दुष्काळावर मात करण्यासाठी प्रत्येक गावाचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करून त्यात पांदण रस्ते, जलसंधारण, पावसाचे पाणी अडविणे-जिरविणे आणि चारा उत्पादनासाठी जमिनीची मशागत यांचा समावेश करावा, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सुचविले. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हौद, टाक्या व सौरपंपांची व्यवस्था करावी. चारा उपलब्धतेसाठी वनविभाग व पशुसंवर्धन विभागाने योजना आखाव्यात, तसेच कमी पाण्यात व कमी कालावधीत येणाऱ्या मका पिकाला प्रोत्साहन देऊन मका उपलब्धतेसाठी ॲप किंवा पोर्टल विकसित करावे, अशी सूचनाही आ.मुनगंटीवार यांनी केल्या.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांची निवेदने सादर केली.दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली. सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पात्र शेतकरी लाभार्थ्यांना निर्धारित ६० दिवसांच्या कालावधीत सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याची कार्यवाही व्हावी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.जिल्हा वार्षिक योजनेतून कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येणाऱ्या करडई, जवस व मोहरी या पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. पीकपद्धतीत परिस्थितीनुरूप बदल करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि मदत मिळणे गरजेचे असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.
दुष्काळामुळे बाधित नोंदणीकृत मच्छीमार व मत्स्य सहकारी संस्थांच्या सदस्यांना बोटूकलीच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वनक्षेत्रातील नाले-तलावांचे खोलीकरण, जलसाठ्यात वाढ आणि अवैध रेती उपशावर कारवाईसाठी वनविभाग व कॅम्पाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच शेतकरी पाल्यांच्या शैक्षणिक शुल्कमाफीच्या निर्णयाबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे अभिनंदन केले.दुष्काळाचे संकट मोठे असले, तरी नियोजन, प्रशासनाचा समन्वय आणि लोकसहभाग यांच्या बळावर त्यावर मात करता येऊ शकते, हा विश्वास व्यक्त करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. पाण्याचा प्रत्येक थेंब जपला जावा, शेतकऱ्यांच्या शिवारात पुन्हा हिरवाई नांदावी आणि ग्रामीण जनजीवनाला दिलासा मिळावा, यासाठी त्यांनी प्रशासनासमोर उपाययोजनांचा व्यापक दृष्टिकोन मांडला.








