विजय वडेट्टीवार यांच्याकडून घरचा आहेर, ग्रामीण भागातील प्रतिसादावर वंजारींचा विजय निश्चित असल्याचा दावा
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नागपूर शहरात अनेक नेत्यांनी निवडणुकीदरम्यान घोळ घातला आणि ‘तुझा की माझा’ असा खेळ खेळत वेळ वाया घालवला, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मात्र, असे असले तरी नागपूर ग्रामीण भागात आणि उर्वरित विदर्भात अभिजित वंजारी यांना पदवीधरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून याच जनसमर्थनाच्या जोरावर वंजारी शंभर टक्के विजय संपादन करतील, असा ठाम विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
निवडणुकीवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री आणि राज्याच्या महसूलमंत्र्यांनी ही पदवीधर निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. सत्तेतील नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीत लावली असताना, काँग्रेस पक्षातील स्थानिक पातळीवरील काही नेत्यांची भूमिका संशयास्पद आणि संथ राहिली. चंद्रपूर, गडचिरोली आणि लगतच्या ग्रामीण भागात अभिजित वंजारी यांच्या पाठीशी मतदार मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत, तिथे त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. मात्र, नागपूर शहरात मात्र चित्र थोडे निराळे होते.
भाजपचे देव पाण्यात; काँग्रेसच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले
नागपूरमधील स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना वडेट्टीवार पुढे म्हणाले की, काही नेत्यांची नावे घेणे योग्य ठरणार नाही, पण वास्तव असे आहे की हे नेते निवडणुकीच्या कामात जरा उशिरा लागले. अभिजित वंजारी हे नेहमी सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सोबत घेऊन चालणारे लोकनेते आहेत, परंतु नागपूर शहरात तशी साठसूट किंवा सलोखा दिसून आला नाही.
अनेकांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यातच वेळ घालवला. नागपूर मधून पन्नास टक्के जरी मते मिळाली तरी नागपूर व्यतिरिक्त उर्वरित विदर्भातील चार ते पाच जिल्ह्यांतून अभिजित वंजारी यांना पदवीधर मतदारांचा उत्तम आणि अभूतपूर्व पाठिंबा मिळाला आहे. ग्रामीण भागातील याच भक्कम भरोशावर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी शंभर टक्के निवडणुकीच्या रिंगणात बाजी मारतील आणि विजयी होऊन विधान परिषदेत जातील, असा ठाम विश्वास वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नागपूर पदवीधर निवडणुकीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पक्षांतर्गत चर्चेलाही उधाण आले आहे.








