निकालासाठी दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडण्याची शक्यता
Nagpur: नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी मानकापूर येथील क्रीडा संकुलात सुरू झाली आहे. मतमोजणीच्या प्रारंभी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली असून, एकूण २३८ पोस्टल मतांपैकी तब्बल ३४ मते अवैध ठरली आहेत. पोस्टल मतदानातच अवैध मतांचे प्रमाण अधिक असल्याने प्रत्यक्ष मतदानातूनही मोठ्या प्रमाणात मते अवैध ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांचा आवश्यक कोटा अद्याप निश्चित होऊ शकलेला नाही.
या निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानाच्या आकडेवारीनुसार उमेदवाराला पहिल्या पसंतीक्रमानुसार विजयासाठी सुमारे ८० हजार मतांचा कोटा मिळवणे आवश्यक आहे. मात्र, अत्यंत अटीतटीची झालेली निवडणूक आणि अवैध मतांची शक्यता पाहता पहिल्या पसंतीतच उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागतील. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी उद्या बुधवारचा दिवस उजाडण्याची दाट शक्यता आहे.
५०० कोटींचा ‘ऑडिओ बॉम्ब’! महायुतीत नेमका कोणाचा खेळ सुरू आहे?
भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत आहे. मतमोजणीस्थळी दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांनी पहिल्या फेरीतच आपल्याला 40 ते 45 हजार मते मिळणार असल्याचा दावा केला आहे. मतदानानंतर ज्या ज्या लोकांना भेटलो त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार आपण हा दावा करीत असल्याचे सांगितले.
सोबतच त्यांनी पहिल्या फेरीतच आपण निवडून येणार असल्याचे सांगितले. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दोन दिवस नागपूरमध्ये ठाण मांडून बसले होते.
नागपूरमध्ये काँग्रेस नेत्यांचा घोळ, ‘तुझा-माझा’ करण्यात वेळ घालवला
ही जागा मागील निवडणुकीत अभिजित वंजारी यांनी भाजपकडून हिसकावून घेतली होती. त्यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद दर्शवली होती. हा पराभव भाजपच्या चांगल्याच जिव्हारी लागला असल्याने यावेळी भाजपने अतिशय काटेकोर नियोजन केले होते. कुठलाही घात होऊ नये याची काळजी घेतली होती. बंडखोर अनिल सोले यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असले तरी भाजपमधील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी या निकालातून पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.








