लोकशाही भवनात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात; १४ टेबलांवर १७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनात मतमोजणीसाठी १४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, १७५ अधिकारी आणि कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार आहेत. सर्व उमेदवारांना पहिल्या पसंतीची किती मते मिळाली, हे स्पष्ट होण्यासाठी दुपारी ४ वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या मतमोजणी प्रक्रियेमुळे अंतिम निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.
२३ ऑक्टोबर रोजी अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील ८१ मतदान केंद्रांवर मतदान झाले. या निवडणुकीत एकूण ३५ हजार ८१० मतदारांपैकी ३३ हजार ३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ९२.२५ इतकी नोंदविण्यात आली.
तीन फेऱ्यांनंतर पहिल्या पसंतीची मते स्पष्ट
मतमोजणीच्या प्रारंभी सर्व ८१ मतदान केंद्रांवरील मतपत्रिका एकत्र करून त्यांची सरमिसळ केली जाणार आहे. त्यानंतर मतपत्रिकांचे प्रत्येकी २५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात येतील. या प्रक्रियेदरम्यान अवैध मतपत्रिका वेगळ्या काढल्या जातील. वैध मतपत्रिकांची एकूण संख्या निश्चित झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा ठरविण्यात येईल.
पहिल्या पसंतीची मते मोजण्यासाठी १४ टेबलांवर प्रत्येकी एक हजार मतपत्रिका ठेवून त्यांची छाननी केली जाईल. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये एकूण २८ हजार मतपत्रिकांची मोजणी होईल. उर्वरित ५ हजार ३४ मतपत्रिकांसाठी तिसरी फेरी घेण्यात येईल. या तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची किती मते मिळाली, हे स्पष्ट होईल.
बियाणी चौक ते विद्यापीठ चौक मार्गावर वाहतूक बंद
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बियाणी चौक ते विद्यापीठ चौक या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बियाणी चौक, चपराशीपुरा, अंध विद्यालय, वडाळी उड्डाणपूल, दंत महाविद्यालय, रचना सृष्टी आणि विद्यापीठ चौक या मार्गाने ये-जा करता येईल.
उत्कर्ष कॉलनी, पोस्टल कॉलनी, एचपी गॅस गोदाम, कोषागार कार्यालय, प्रबोधिनी आणि कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून जुन्या मार्गाने ये-जा करण्याची परवानगी असेल. वाहनांच्या पार्किंगसाठी कृषी कार्यालयाच्या परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे.








