‘मत वाचवा – देश वाचवा’ मोहिमेअंतर्गत चावडी सभा; खासदार बळवंत वानखडे, बबलू देशमुख यांची उपस्थिती
Amravati मतदार यादीतील संभाव्य अनियमितता उघड करण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसने जिल्ह्यात गावागावांत चावडी सभा घेण्याचे नियोजन केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात मतदार यादी पडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)ची कार्यकारिणी बैठक सोमवारी काँग्रेस भवनात पार पडली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक शाकीर सनदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला खासदार बळवंत वानखडे आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख उपस्थित होते.
२५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान अभियान
काँग्रेसच्या नियोजनानुसार, २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, वरिष्ठ नेते आणि बूथस्तरीय प्रतिनिधी यांच्या बैठका घेऊन पुढील कार्यक्रम निश्चित केले जाणार आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट (बीएलए) आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदार याद्यांची पडताळणी केली जाणार आहे. मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे तसेच संभाव्य त्रुटी आणि अनियमितता शोधून त्यांची नोंद घेण्यात येईल. वगळण्यात आलेल्या नावांची यादी संबंधित बीएलएकडून ब्लॉक काँग्रेस कमिटी कार्यालयात सादर केली जाणार आहे.
चावडी सभांमधून मतदारांमध्ये जनजागृती
जिल्ह्यातील गावागावांत चावडी सभा घेऊन मतदारांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची आणि मतदार यादी पडताळणीच्या महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे. या सभांमध्ये ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत प्रतिनिधी, माजी सदस्य आणि स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे.
भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२६ मधील प्रौढ मताधिकारासंबंधीच्या तरतुदींची माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे. मतदारांचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवणे आणि मतदार यादीतील संभाव्य त्रुटींबाबत नागरिकांना जागरूक करणे, हा या अभियानाचा उद्देश असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीला प्रकाश काळबांडे, मुकद्दर खा पठाण, प्रदीप देशमुख, शैलेश गवई, संजय वानखडे, प्रवीण मनोहर, भागवत खांडे, अरविंद लंगोटे, समीर पाटील, सुनील गावंडे, रोहित पटेल, श्रीकांत झोडपे, प्रमोद दाळू, बिट्टू मंगरोळे, संजय बेलोकर, किशोर देशमुख, बाबूभाई इनामदार, भूषण कोकाटे, सेतू देशमुख, सहदेव बेलकर, रामगोपाल मावसकर, सतीश हाडोळे, महेंद्र गैलवार, राजाभाऊ बंड, डॉ. रवींद्र वाघमारे, भाई देशमुख, नामदेव तनपुरे, गजानन टापरे, प्रवीण हूड, मयूर देशमुख, सच्चिदानंद बेलसरे, प्रवीण सवई, मुकुंद देशमुख, वैभव वानखडे, समाधान दहातोंडे आणि किशोर कितुकले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








