व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण दुष्काळग्रस्त महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करा; राष्ट्रवादीच्या डॉ. फौजिया खान यांची...

दुष्काळग्रस्त महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करा; राष्ट्रवादीच्या डॉ. फौजिया खान यांची सरकारकडे मागणी

गडचिरोलीतील महिला संवादातून ग्रामीण महिलांच्या संघर्षाचे वास्तव समोर

Gadchiroli : दुष्काळाचा परिणाम केवळ शेती आणि पाणीटंचाईपुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचे गंभीर परिणाम महिलांचे आरोग्य, पोषण, रोजगार आणि संपूर्ण कौटुंबिक अर्थव्यवस्थेवर होतात. घराची जबाबदारी सांभाळताना आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महिलांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी खासदार डॉ. फौजिया खान यांनी केली.

दुष्काळग्रस्त महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात आयोजित महिला संवादादरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, महिला जिल्हाध्यक्षा संगीता राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळाच्या झळा महिलांच्या जगण्यावर
दुष्काळाच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट, घरखर्चाचे वाढते ओझे, कर्जफेडीची चिंता आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी यामुळे ग्रामीण महिलांचे जीवन अधिक खडतर होत आहे.

वंजारी-कोहळे यांच्यात कांटे की टक्कर; कराळे गुरुजींची दुसरी पसंती ठरणार किंगमेकर

मात्र, दुष्काळावरील उपाययोजनांमध्ये महिलांच्या आरोग्याचा, पोषणाचा आणि रोजगाराचा पुरेसा विचार होत नसल्याची भूमिका डॉ. खान यांनी मांडली. महिलांच्या अडचणींचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांना आर्थिक व सामाजिक आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

महिला संवादादरम्यान भामरागड तालुक्यातील एका महिलेने मांडलेली व्यथा उपस्थितांना भावूक करणारी ठरली. पाच वर्षांपूर्वी पोलीस पतीचे निधन झाल्यानंतर मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर आली. दरमहा मिळणाऱ्या अवघ्या १२ हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये घर चालवायचे, मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाह करायचा की महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरायचे, असा प्रश्न तिने उपस्थित केला. त्यातच शेतीनेही साथ सोडल्याने जगण्याचा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे तिने सांगितले.

या वेदनादायी अनुभवाने उपस्थित महिलांनाही गहिवरून आले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम हलगेकर आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या शाहीन हकीम यांच्या पुढाकारातून आयोजित या मेळाव्यात महिलांनी आपल्या अडचणी मोकळेपणाने मांडल्या.

मुलचेरा तालुक्यातील गोविंद येथील प्रणोती आत्राम यांनी ग्रामीण भागातील दळणवळणाच्या समस्येकडे लक्ष वेधले. गावात बससेवा उपलब्ध नसल्याने उपचारांसाठी महिलांना आणि शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तब्बल ११ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या गोटात अस्वस्थता, काँग्रेसच्या वंजारींनी घेतली आघाडी

वाहतुकीच्या अभावामुळे आरोग्यसेवा आणि शिक्षण मिळवतानाही ग्रामीण नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे या उदाहरणातून स्पष्ट झाले.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा
महिलांनी मांडलेल्या समस्यांचा एकत्रित अहवाल पक्षाच्या वतीने तयार करून शासनापुढे मागण्या मांडण्यात येणार आहेत. या मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर महिलांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला जाईल, असा इशारा डॉ. फौजिया खान यांनी दिला.खासदार शरद पवार यांनीही यापूर्वी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून दुष्काळग्रस्त महिलांच्या समस्यांसंदर्भात सविस्तर मागण्या केल्याचे त्यांनी नमूद केले.

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांमध्ये महिलांचे आरोग्य, रोजगार, कर्जाचा भार आणि मुलांचे शिक्षण या मुद्द्यांचा समावेश करण्याची मागणी पुढे आल्याने, आता राज्य सरकार या प्रश्नांकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!