शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
Wani : शहरासह तालुक्यातील विविध नागरी आणि प्रशासकीय प्रश्नांवरून शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण हटविण्याची कारवाई, मतदार यादीतून काही मतदारांची नावे वगळल्याचा आरोप तसेच अवैध कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणारे प्रदूषण आणि अपघातांचे धोके या मुद्द्यांवर शिवसेनेने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख आशिष खुलसंगे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
वणी नगर परिषद हद्दीत मुख्याधिकाऱ्यांकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात असल्याचा आरोप शिवसेनेने निवेदनातून केला आहे. या कारवाईमुळे संबंधित नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण होत असल्याचेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
उमरखेडमध्ये पुतळ्याच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष; पाणीटंचाईसह मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष
याशिवाय वणी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतून काही मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तालुक्यातील निलजई गावात असा प्रकार घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चिखलगाव, राजूर आणि लालपुलिया येथील विविध प्रश्नांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
अवैध कोळसा वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषण वाढत असून, या वाहतुकीतून अपघातांचा धोका निर्माण होत असल्याचा मुद्दाही शिवसेनेने उपस्थित केला आहे. नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकरणात संबंधित विभागांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. संबंधित अतिक्रमणधारकांना वर्षभरापूर्वीच नोटीस देण्यात आली होती. स्वतःहून अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन देऊनही त्यांनी कारवाई न केल्यामुळे नगर परिषदेकडून अतिक्रमण हटविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बावनकुळेंचा कोहळेंना पदवीधरमधून आमदार करण्याचा हट्ट; निष्ठावंतांनी मतपेटीतून विरोध केला घट्ट!
शिवसेनेच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख आशिष खुलसंगे यांनी दिला आहे. यावेळी जिल्हासंघटक विजय चोरडिया, वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे, झरी तालुकाप्रमुख बाळू चेडे यांच्यासह विशाल किन्हेकर, किशोर नांदेकर, उमेश वैरागडे, तुकाराम माथनकर, सोनल घुगूल, बंटी ठाकूर, अजय नागपुरे, मनीष सुरावार, सुधाकर गोरे, शुभम गिरे, अजिंक्य शेंडे, विक्की चवणे, नरेंद्र बदकार्यवाहीखल आणि मीनानाथ काकडे उपस्थित होते.








