व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण उमरखेडमध्ये पुतळ्याच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष; पाणीटंचाईसह मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष

उमरखेडमध्ये पुतळ्याच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष; पाणीटंचाईसह मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; नागरिकांकडून विकासकामांना प्राधान्य देण्याची मागणी

Umarkhed : शहरात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीवरून स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणाऱ्या नगराध्यक्ष तेजश्री संतोष जैन आणि भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी ही नागरिकांच्या भावना आणि अस्मितेशी जोडलेली आहे. त्यामुळे पुतळा उभारणीच्या प्रयत्नांना विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, या विषयावरून राजकीय श्रेयवाद रंगण्याऐवजी शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय समन्वय साधण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सुमारे ६० हजार लोकसंख्या असलेल्या उमरखेड शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आगामी काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन, विहिरींचा वापर, पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था आणि नवीन जलस्रोत निर्माण करण्याच्या उपाययोजनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय प्रमुख मार्गांवरील तसेच विविध प्रभागांतील रस्ते, नाल्या आणि पथदिव्यांच्या समस्याही कायम आहेत.

बावनकुळेंचा कोहळेंना पदवीधरमधून आमदार करण्याचा हट्ट; निष्ठावंतांनी मतपेटीतून विरोध केला घट्ट!

नगराध्यक्ष तेजश्री जैन यांनी पाणीटंचाईबाबत स्पष्टीकरण देताना रेल्वेच्या कामामुळे तसेच इसापूर धरणातून येणाऱ्या डाव्या कालव्याच्या परिसरात नवीन बांधकाम सुरू असल्याने पाणी आणण्यात अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले. नगरपालिकेच्या सत्तेला दहा महिने झाले असून, त्यातील काही काळ आचारसंहितेत गेल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य देणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सत्ताधाऱ्यांवर विकासकामांपेक्षा राजकारणाला महत्त्व देत असल्याचा आरोप केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह अन्य विकासकामांसाठी शासनाकडून मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असताना ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा दावा त्यांनी केला. जनहिताच्या कामांना तातडीने सहकार्य करण्याची मागणीही त्यांनी केली.

ईव्हीएमवर आरोप, मतपत्रिकेवरही पराभव; काँग्रेसच्या दाव्यांतील विरोधाभास उघड !

दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमधील मतभेद व्यवस्थेचा भाग असले, तरी त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. पुतळा उभारणीचा विषय आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यापलीकडे जाऊन पाणी, रस्ते, स्वच्छता व पथदिवे यांसारख्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उमरखेडच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रितपणे काम करणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

error: Content is protected !!