विदर्भातील ११ जिल्ह्यांत महिला जनसंवाद आणि वस्तुस्थिती सर्वेक्षण; महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतुदीची मागणी
Washim : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता महिलांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत राज्य सरकारविरोधात राजकीय आघाडी उघडण्याचे संकेत दिले आहेत. दुष्काळाचा सर्वाधिक फटका कुटुंबातील महिलांना बसत असतानाही शासनाच्या उपाययोजनांमध्ये त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने राज्यव्यापी जनसंवाद आणि वस्तुस्थिती सर्वेक्षण सुरू केले आहे. या अभियानांतर्गत राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा, माजी खासदार डॉ. फौजिया खान विदर्भाच्या दौऱ्यावर असून, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये महिलांशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती त्यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दुष्काळाचा महिलांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम, पाणीटंचाई, रोजगाराचा अभाव, आरोग्य, पोषण, सुरक्षितता आणि मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेण्यावर या अभियानाचा भर असल्याचे डॉ. खान यांनी सांगितले. ग्रामीण भागातील महिलांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर त्यांच्या गरजांनुसार शासनाकडे विशेष उपाययोजनांची मागणी करण्यात येणार आहे.
शेतकरी आक्रमक; एमआयडीसीविरोधातील आंदोलकांचे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष !
या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी पाठविलेल्या पत्राचाही संदर्भ दिला. राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना सरकारचे त्याकडे पुरेसे लक्ष नसल्याची टीका त्यांनी केली. २४ तास राजकारण, धर्मकारण, सत्ताकारण आणि अर्थकारणात गुंतलेल्या ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त जनतेच्या प्रश्नांचे गांभीर्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुष्काळाचा परिणाम केवळ शेती आणि उत्पन्नापुरता मर्यादित राहत नाही. पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी धावपळ, रोजगाराच्या संधी कमी होणे, कुपोषणाचा धोका, आरोग्याच्या समस्या आणि मुलांच्या शिक्षणात निर्माण होणारे अडथळे या प्रश्नांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. खान यांनी स्पष्ट केले. दुष्काळ निवारणाच्या योजनांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद, विशेष मदत आणि त्यांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली.
विदर्भातील ११ जिल्ह्यांतील जनसंवाद पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या दौऱ्यातून समोर येणाऱ्या समस्यांचा अहवाल तयार करून शासनासमोर महिलांच्या प्रश्नांची वस्तुस्थिती मांडली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, अंजली साळवे, सोनाली देशमुख, वर्षा निकम, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली मेश्राम आणि ज्योती गणेशपुरे उपस्थित होत्या.
आर्वी बाजार समितीतील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर; उपसभापतींवरील अविश्वास बारगळला!
एकीकडे राज्य सरकार दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करीत असल्याची भूमिका मांडत असताना विरोधकांकडून प्रत्यक्ष ग्रामीण परिस्थिती आणि विशेषतः महिलांच्या प्रश्नांवरून सरकारला जाब विचारण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा हा दौरा केवळ जनसंवादापुरता मर्यादित न राहता दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारविरोधातील राजकीय दबाव वाढविण्याच्या रणनीतीचा भाग ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








