व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण पदवीधरमधील भाजपच्या पराभवाचे धागेधोरे विद्यापीठापर्यंत

पदवीधरमधील भाजपच्या पराभवाचे धागेधोरे विद्यापीठापर्यंत

नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ भाजपच्या रडारवर

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या अनपेक्षित आणि धक्कादायक पराभवानंतर भाजप ॲक्शन मोडमध्ये आला आहे. या पराभवामागे पक्षांतर्गत झारीतील शुक्राचार्य कोण, याचा शोध अत्यंत गांभीर्याने घेतला जात असतानाच, आता नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठातील ‘गडबडी’चे धागेधोरे समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

भाजपसाठी कमालीच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत गमावलेला मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः निवडणूक प्रभारी म्हणून सूत्रे हाती घेतली होती, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवस मुक्काम ठोकून शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आणि सामाजिक बैठकांचा धडाका लावला होता. मतदानाच्या दिवशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेक बूथला भेटी दिल्याने मतदानाचा टक्का वाढला आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सुमारे ६० हजार मते घेत पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोहळे आघाडीवर होते, मात्र विजयाचा निश्चित कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागली आणि अनपेक्षितपणे निकाल बदलला.

भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा मार्ग, मुनगंटीवारांनी राजधानीत उलगडली अमूल्य विचारधारा

या मतमोजणीदरम्यान सुमारे ८ ते ९ हजार मते अवैध ठरली असून, त्यातील बहुतांश मते भाजपचीच असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, हजारो मतदारांनी कोहळे यांच्या नावापुढे ‘२’ हा आकडा लिहून एकाच विशिष्ट पद्धतीने मतदान अवैध केले होते. एकाच प्रकारची एवढी मोठी मते बाद झाल्याने हा केवळ योगायोग नसून मोठा कट असल्याचा संशय बळावला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट चौकशीचे आदेश दिले असून, पक्षातील एकाच वर्तुळातील पाच प्रमुख नेत्यांची नावे सध्या मुख्यमंत्र्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आली आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘हिटलिस्ट’वर भाजपचे ५ नेते

दरम्यान, या तपासाची सुई आता नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठाकडे वळली आहे. या विद्यापीठांमधून भाजपविरोधात मोठ्या प्रमाणावर मतदान घडवून आणल्याचे समोर येत आहे. नागपूर विद्यापीठातील एका बड्या महिला अधिकाऱ्याने प्रचारदरम्यान घेतलेल्या बैठकीत कोहळे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचे समजते, तर गोंडवाना विद्यापीठातून भाजपच्या विरोधात मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्याचा दावा केला जात आहे. हा प्रकार कोहळे यांच्यापेक्षा थेट सरकारवर काढलेला राग असल्याचे मानले जात असून, विद्यापीठातील प्रमुखांच्या गुप्त बैठकीचे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ फुटेज आणि भक्कम पुरावे भाजप नेत्यांच्या हाती लागले आहेत. या पुराव्यांमुळे आगामी काळात विद्यापीठातील अनेक बड्या हस्तींवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

error: Content is protected !!