‘आरोप करण्यापेक्षा विकास करून दाखवा’; बच्चू कडूंना माकोडे यांचे आव्हान
Amravati अचलपूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण चांगलेच तापले आहे. विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक संघर्षात आता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुरली माकोडे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधत आरोप करण्यापेक्षा मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. हिंमत असेल तर आरोप-प्रत्यारोप न करता विकासकामे करून दाखवा, असे खुले आव्हान माकोडे यांनी कडू यांना दिले.
बच्चू कडू यांनी आमदार प्रवीण तायडे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर माकोडे यांनी आपली भूमिका मांडली. केवळ राजकीय टीका करून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यापेक्षा मतदारसंघासाठी मोठे विकासप्रकल्प आणून दाखवावेत, असे त्यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी विकासकामांसाठी सत्तेतील नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा मुद्दाही उपस्थित केला.
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी; मानोऱ्यात राजकीय गणितांना वेग
‘बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्र्यांकडून मोठे प्रकल्प आणावेत, तर प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विकासकामे आणतील,’ अशी गुगली माकोडे यांनी टाकली. त्यांच्या या विधानामुळे अचलपूरमधील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कडू आणि तायडे यांच्यातील वादात भाजपच्या पदाधिकाऱ्याने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या राजकीय जुगलबंदीत आता कोण काय प्रत्युत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींत अचलपूरच्या नागरिकांना अपेक्षा आहे ती प्रत्यक्ष विकासकामांची. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, रोजगार, पाणीपुरवठा आणि इतर नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य द्यावे, अशी जनभावना व्यक्त होत आहे. त्यामुळे राजकीय आरोपांच्या फैरींपेक्षा विकासकामांचा कृती अहवाल कधी समोर येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








