निवडीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव, राजकीय वर्तुळात नव्या चर्चा
Gadchiroli : जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांची निवड यादी जाहीर झाली असून, या निवडीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांच्या या निवडीकडे केवळ समितीवरील नियुक्ती म्हणून न पाहता, भाजपमधील अंतर्गत राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पुनरागमन म्हणून पाहिले जात आहे.
किशन नागदेवे यांना यापूर्वी दोन वेळा जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. देसाईगंज नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमधील त्यांचा सक्रिय सहभाग ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. नव्या नियुक्तीमुळे त्यांना पुन्हा एकदा जिल्ह्याच्या विकासकामांशी संबंधित नियोजन प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
जिल्हा बँकेच्या सत्तेत झेंडे बदलले, पण रिमोट कंट्रोल जुन्याच नेत्यांकडे!
गेल्या काही काळापासून गडचिरोली भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आणि कुरघोड्यांचे राजकारण तीव्र झाल्याची चर्चा आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना काही स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यातच बाहेरील जिल्ह्यातील एका व्यापारी नेत्याचा गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढता हस्तक्षेप असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या घडामोडींमुळे स्थानिक नेतृत्व आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
अशा परिस्थितीत किशन नागदेवे यांची नियोजन समितीवर झालेली नियुक्ती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरते. पक्षातील जुन्या आणि अनुभवी नेतृत्वाला पुन्हा संधी देण्यामागे कोणते राजकीय समीकरण आहे, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. किशनभाऊंसाठी नियोजन समितीवरील नियुक्ती ही केवळ प्रतिष्ठेची बाब नसून, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा सक्रिय होण्याची संधी ठरू शकते. त्यांची ‘मिशन नियोजन’ मोहीम यशस्वी झाली असली, तरी आगामी काळात ते पक्षांतर्गत राजकारणात कोणती भूमिका बजावतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
नागपूरच्या सुनिता गावंडे महाराष्ट्राच्या प्रभारी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी
नियोजन समितीवरील नियुक्तीने किशन नागदेवे यांचे राजकीय पुनरागमन झाले आहे. मात्र, या पुनरागमनाचा पुढचा टप्पा कोणता? पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची भूमिका ते घेणार की जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने आपले स्थान निर्माण करणार? ‘नियोजन’ फत्ते झाले असले, तरी किशनभाऊंचे पुढचे राजकीय गणित काय, हा प्रश्न सध्या गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
___








