प्रफुल पटेलांच्या भेटीचे टायमिंग, महायुतीमध्ये तर्कवितर्क
Nagpur ज्येष्ठ नेते शरद पवार लवकरच ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात तीव्र झाली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी नुकतेच एका वक्तव्यातून हे संकेत मिळाल्याचे म्हटल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून तब्येतीची विचारपूस केली. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांना आम्ही सांभाळून घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे समजते. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात आहेत. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे मला ठाऊक नाही, परंतु ते आमच्याकडे येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रफुल पटेल हे ज्येष्ठ नेते असून, शरद पवारांना महायुतीत घेण्याबाबतची चर्चा वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये होईल.
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत, बळीराजाचा अश्रू पुसण्यासाठी थेट बांधावर जाणार
दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. मात्र, या बैठकीला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित नव्हते.
त्याच दिवशी पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली, तसेच अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीला मिळावे आणि परस्पर नियुक्त्यांवर आक्षेप घेण्यात आला. पटेल व तटकरे यांना डावलले जात असल्याची चर्चा असतानाच, शरद पवारांना सोबत घेण्याच्या हालचालींमुळे ‘दादां’च्या गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
इंडिया आघाडीचे षड्यंत्र; भाजप पदयात्रेतून चोख उत्तर देणार, बावनकुळेंचा थेट घणाघात
दरम्यान, या सर्व चर्चांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत या वृत्तांचे खंडन केले आहे. आजारपणात भेटायला आलेल्या नेत्यांसोबत शरद पवार राजकारणावर चर्चा करतील, असे मला वाटत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. यावर शरद पवारांनी अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही, परंतु या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.








