व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण उमरखेडमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकीय संघर्ष पेटला; पेट्रोलपंपाच्या अतिक्रमणावरून जिजाऊ ब्रिगेड आक्रमक

उमरखेडमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकीय संघर्ष पेटला; पेट्रोलपंपाच्या अतिक्रमणावरून जिजाऊ ब्रिगेड आक्रमक

१४ नोव्हेंबरपासून सरोज देशमुख यांचे बेमुदत उपोषण; प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

Umarkhed : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मुद्दा उमरखेडमध्ये पुन्हा ऐरणीवर आला असून, पुतळ्यासमोरील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपाच्या कथित अतिक्रमणावरून संघर्ष तीव्र झाला आहे. अतिक्रमण हटविल्याशिवाय पुतळ्याचे अनावरण होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा जिजाऊ ब्रिगेडच्या सरोज देशमुख यांनी घेतला आहे. पेट्रोलपंपाला संरक्षण देण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव आणला जात आहे का, तसेच यामागे आर्थिक देवाणघेवाणीचा प्रकार आहे का, असा सवाल उपस्थित करून त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला.

देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. याप्रकरणी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी येत्या १४ नोव्हेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोलपंपाच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासंदर्भात २१ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्या रस्त्याच्या १२ व १५ मीटरच्या मर्यादेत येत असल्याने अतिक्रमणाचा मुद्दा नोंदविण्यात आला होता. संबंधित टाक्या हटविण्याची कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. यापूर्वी २०२५ पासून ११ एप्रिल २०२६ पर्यंत सात वेळा स्फोटक नियंत्रण विभागाकडे पत्रव्यवहार करून हरकत नोंदविल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवार इंडिया आघाडी सोडणार? पंकज भोयर यांच्या संकेतांनी राजकीय वर्तुळात खळबळ

२९ जून रोजी झालेल्या पाहणीत अतिक्रमण आढळल्याचा पंचनामा करण्यात आला. सात दिवसांत टाक्या हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, १२ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने टाक्या अतिक्रमणात येत नसल्याचा अहवाल दिल्याचा आरोप देशमुख यांनी केला. आधीच्या भूमिकेच्या नेमक्या उलट अहवाल कोणाच्या आदेशाने तयार झाला, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन झाले का आणि वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली होती का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत, बळीराजाचा अश्रू पुसण्यासाठी थेट बांधावर जाणार

दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. मात्र, तक्रारदारांना पूर्वसूचना न देता त्यांना प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी नाकारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी, अतिक्रमणाबाबतच्या पूर्वीच्या आदेशांची अंमलबजावणी करावी आणि संबंधित टाक्यांबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. केवळ आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट करत मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी ललिता खंदारे, दिनेश रावते, स्वप्निल कनवाळे, शुभम माने, परमानंद चोपडे, महेंद्र कावळे, गणराज कदम, नितीन देशमुख, कैलास राऊत आणि अरुण ठाकरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!