सुनील तटकरेंच्या विधानावर अमोल मिटकरींचा संताप
Akola राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘अजितदादा आज असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या. त्यांच्या अपघाती निधनामुळे विलीनीकरणाचा विषय मागे पडला,’ असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर माजी आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक प्रतिक्रिया देत तटकरे यांच्यासह काही नेत्यांना लक्ष्य केले आहे.
सुनील तटकरे यांच्या विधानावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, आता विलीनीकरणाबाबत वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची यापूर्वीची विधाने तपासली, तर त्यांनीच ‘विलीनीकरणाची एवढी घाई का झाली?’ असा सवाल उपस्थित केला होता. ‘अजितदादा आमच्याशी कधी बोललेच नाहीत,’ असेही ते म्हणत होते. वैयक्तिक भडास काढायची असेल, तर ती वैयक्तिक मतांमधून मांडा, अशी भूमिका याच नेत्यांनी घेतली होती. या विधानांवरून मिटकरी यांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
पुढे बोलताना मिटकरी म्हणाले की, अजितदादांनी शरद पवार यांच्यासोबत १३ ते १४ बैठका केल्या. त्या वेळी अजितदादा एकटेच होते. त्यानंतर काही नेत्यांकडून वारंवार वेगवेगळी विधाने केली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काही दूधखुळे नाहीत. त्यामुळे नेत्यांनी आपापली वैयक्तिक मते मांडावीत; मात्र दुसऱ्यांवर वैयक्तिक भडास काढू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
दिवाळी झाल्यावर पीक विम्याचे पैसे देणार का?, उद्धवसेनेच्या नेत्याचा सवाल
रुग्णालयात जाऊन व्हिडिओ चित्रित करण्याची गरज नव्हती
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष एकत्र यावेत, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. अजितदादा असते, तर विलीनीकरण झाले असते, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे मिटकरी म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देताना मिटकरी म्हणाले की, रुग्णालयात भेटायला गेल्यानंतर व्हिडिओ चित्रित करण्याची गरज नव्हती. दहा तारखेनंतर काय होणार आहे, हे शरद पवार यांना माहीत आहे. रुग्णालयातील भेटीचे चित्रण करून ते व्हिडिओ व्हायरल करण्याचीही आवश्यकता नव्हती, असे त्यांनी म्हटले.
खाट सभांच्या माध्यमातून काँग्रेसचा जनसंपर्क; जनतेचा विश्वास पुन्हा मिळविण्याची धडपड!
दिवाळीनंतर मोठा राजकीय भूकंप होणार?
अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दिवाळीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत सत्य समोर येईल आणि त्यातून मोठा राजकीय भूकंप होईल, असे सूचक विधानही मिटकरी यांनी केले. दिवाळीनंतर रोहित पवार पत्रकार परिषद घेणार असून, हा कथित घातपात कोणी घडवून आणला, यासंदर्भात ते स्पष्ट भूमिका मांडतील, अशी माहिती मिटकरी यांनी दिली.








