अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी
Akola अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासोबतच पक्षांतर्गत कुणी दगाफटका केला का, याचाही शोध घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यासाठी पक्षाने चार वरिष्ठ नेत्यांची चौकशी समिती गठित केली असून, या समितीच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जाणार आहे.
यंदा प्रथमच काँग्रेसने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी सुरुवातीपासूनच जोरदार तयारी केली होती. पक्षाने प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यापासूनच अकोला, यवतमाळसह प्रदेशाध्यक्ष सतेज सपकाळ यांच्याही पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू होती. मात्र, प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.
निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसमधील नेत्यांनीच गेम केल्याचे विधान केले होते. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात काहीतरी अघटित घडले असावे, असा संशय काँग्रेसला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत दगाफटका झाला का, याचीही चौकशी करण्याची मागणी काही नेत्यांनी केली आहे.
काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांना आठ हजारांहून अधिक मते मिळाली होती. पक्षाने पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच आपला उमेदवार विजयी होईल, असे नियोजन केले होते. मात्र, नेमके कुठे चुकले आणि निवडणुकीतील महत्त्वाच्या टप्प्यांवर काही नेत्यांची भूमिका काय होती, याबाबतचे काही किस्से आता पुढे येत आहेत. त्यामुळे या सर्व बाबींची चौकशी समितीमार्फत केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या समितीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान आणि पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस बी. एम. संदीप यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांकडून सविस्तर अहवाल मागविणार आहे. त्यानंतर निवडणुकीतील कामगिरी, प्रचाराचे नियोजन आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका यांचा आढावा घेतला जाणार आहे.
दिवाळी झाल्यावर पीक विम्याचे पैसे देणार का?, उद्धवसेनेच्या नेत्याचा सवाल
चौकशीला पूर्ण सहकार्य करणार
या मतदारसंघातील काँग्रेसचा पराभव पक्षाने गांभीर्याने घेतला आहे. निवडणुकीत सर्वांनीच परिश्रम घेतले; मात्र आणखी थोडी मेहनत घेण्याची गरज होती. या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षात चैतन्य निर्माण झाले होते. वरिष्ठांनी नियुक्त केलेल्या समितीने कोणतीही माहिती मागितल्यास आम्ही संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश तयाडे यांनी दिली.








