विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र शहरप्रमुख; संघटनात्मक बळकटीसोबत अधिकारांच्या संघर्षाचीही भीती
Nagpur: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नागपूर शहरात संघटनात्मक पातळीवर मोठा बदल करत एकाच वेळी सहा शहरप्रमुखांची नियुक्ती केली आहे. सर्वसाधारणपणे एका शहरात एक किंवा दोन शहरप्रमुख नियुक्त करण्याची पद्धत असताना नागपुरात सहा शहरप्रमुखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पक्षसंघटना अधिक मजबूत करणे, अंतर्गत मतभेदांना आळा घालणे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र नेतृत्व उभे करणे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
नागपूरचे संपर्कमंत्री संजय निरुपम यांच्या हस्ते विभागीय संघटक किरण पांडव, जिल्हाप्रमुख सूरज गोजे आणि नितीन तिवारी यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
केंदळे – नाईक भेटीने वाशिमच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; सदिच्छा की राजकीय संकेत?
नव्या संघटनात्मक रचनेनुसार पूर्व नागपूरमधून रविनीश पांडे, मध्य नागपूरमधून राजेश तुमसरे, पश्चिम नागपूरमधून विकास आंबोरे, उत्तर नागपूरमधून सुनील बॅनर्जी, दक्षिण नागपूरमधून विशाल कोके, तर दक्षिण-पश्चिम नागपूरमधून सुमुख मिश्रा यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या कामकाजासाठी स्वतंत्र पदाधिकारी उपलब्ध होणार आहेत.
शिवसेनेने यापूर्वीच नागपूर शहरात तीन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार उत्तर आणि मध्य नागपूरची जबाबदारी सूरज गोजे यांच्याकडे, दक्षिण आणि पूर्व नागपूरची जबाबदारी नितीन तिवारी यांच्याकडे, तर दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपूरची धुरा समीर शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आता या जिल्हाप्रमुखांच्या जोडीला सहा शहरप्रमुखांची नियुक्ती झाल्याने पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नव्या नियुक्त्यांमुळे पक्षाला प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र नेतृत्व मिळणार असले, तरी जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुख अशी दोन पदे एकाच मतदारसंघात कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे जबाबदाऱ्यांचे स्पष्ट विभाजन आणि परस्पर समन्वय राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. अधिकारांचे वाटप, निर्णयप्रक्रिया आणि कार्यकर्त्यांवरील प्रभाव यावरून भविष्यात मतभेद निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नव्या रचनेचे यश हे पदाधिकाऱ्यांमधील समन्वयावर अवलंबून राहणार आहे.
एकेकाळी नागपूर शहरात शिवसेनेची राजकीय ताकद लक्षणीय होती. युतीच्या काळात पूर्व नागपूरमधून शेखर सावरबांधे यांनी विजयासाठी जोरदार लढत दिली होती. प्रवीण बरडे आणि ज्ञानेश वाकुडकर यांनीही काँग्रेससमोर आव्हान उभे केले होते. मात्र, नागपूरमध्ये शिवसेनेला अद्याप आमदार निवडून आणता आलेला नाही. युती तुटल्यानंतर भाजपने शहरातील राजकीय वर्चस्व अधिक मजबूत केले.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाला नागपूर महापालिकेत अद्याप नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्या जागावाटपात नागपुरातील एकही मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आला नव्हता.
या पार्श्वभूमीवर सहा शहरप्रमुखांची नियुक्ती हा पक्षासाठी संघटनात्मक विस्ताराचा प्रयत्न मानला जात आहे. मात्र, या नव्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करून प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवता येते का, हे महत्त्वाचे ठरणार आहे. सहा शहरप्रमुखांची नियुक्ती नागपुरात शिंदेंच्या शिवसेनेला नवी उभारी देणार की पक्षांतर्गत अधिकारांच्या संघर्षाला निमंत्रण देणार, याचे उत्तर आगामी राजकीय घडामोडींमधून स्पष्ट होईल.








