नगरपालिका इमारतीतील मांसाहारी पार्टी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा प्रस्ताव
Amravati मोर्शी नगरपालिकेच्या इमारतीत मांसाहारी पार्टी आयोजित केल्याच्या प्रकरणात मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी सायंकाळी निलंबनाचा प्रस्ताव नगरपालिका प्रशासनाच्या अपर सचिवांकडे पाठविला. तसेच, वानखडे यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक संचालक टवलारे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दुष्काळी परिस्थिती असताना नगरपालिकेच्या इमारतीत मांसाहारी पार्टी आयोजित करून लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केला होता. या प्रकरणी मुख्याधिकारी वानखडे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती.
स्व. गोवर्धन शर्मांवर टीका करण्याचा अधिकार नितीन देशमुखांना कोणी दिला? वैशाली शेळकेंचा सवाल
नोटीसनंतर टपालाद्वारे खुलासा
भाजपच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी मुख्याधिकारी वानखडे यांना नोटीस बजावली होती. सोमवारी प्रत्यक्ष उपस्थित राहून खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वानखडे यांनी सोमवारी दुपारी टपालाद्वारे आपला खुलासा नगरपालिका प्रशासनाच्या सहायक आयुक्तांकडे पाठविला.
खुलासा असमाधानकारक; निलंबनाचा प्रस्ताव
मोर्शी-वरूडचे आमदार चंदूभाऊ यावलकर यांनीही या प्रकरणात मुख्याधिकारी वानखडे यांच्यासह पार्टीत सहभागी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवकांवर कारवाईची मागणी केली होती. भाजपची तक्रार आणि आमदारांची मागणी यासंदर्भात जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
उदय सामंतांचा भाजपला नाव न घेता इशारा, महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर!
या बैठकीत मुख्याधिकारी वानखडे यांनी सादर केलेल्या खुलाशाची छाननी करण्यात आली. खुलासा समाधानकारक नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली. त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम असल्याचा दावा
मुख्याधिकारी वानखडे यांनी खुलाशात हा कार्यक्रम नगरपालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आल्याचे म्हटले आहे. कार्यक्रमासाठी नगरपालिकेच्या निधीचा वापर करण्यात आला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी मद्यपान किंवा ‘ओली पार्टी’ झाल्याचा आरोपही फेटाळला.
मात्र, अधिकाऱ्यांसाठी निर्धारित आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी काही प्रमाणात मान्य केले. भविष्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन करताना शासनाचे नियम आणि वरिष्ठांचे निर्देश पाळले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.








