व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचेच; कालावधीवरून विजय वडेट्टीवार संतप्त

हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचेच; कालावधीवरून विजय वडेट्टीवार संतप्त

राजकीय वादाची ठिणगी; विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिक दिवसांचे कामकाज घेण्याची मागणी

 

Nagpur : डिसेंबर महिन्यात नागपूर येथे होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचे घेण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान तीन आठवड्यांचा असावा, अशी आक्रमक मागणी केली आहे.

मुंबई येथे पार पडलेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागपूर अधिवेशनासाठी होणारा खर्च टाळून तो निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, अशी मागणी ‘जनमंच’ या संस्थेने केली होती. या मागणीला ‘विदर्भ राज्य पार्टी’ने तीव्र विरोध दर्शवत हिवाळी अधिवेशन नागपुरातच घेण्याची भूमिका मांडली होती. अखेर सरकारने अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा कालावधी अवघ्या दोन आठवड्यांपर्यंत मर्यादित ठेवल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

‘प्रहार’सोबतच शिंदेसेनेचीही धुरा बच्चू कडूंच्या खांद्यावर?

 

सरकारच्या निर्णयावर टीका करताना विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. विदर्भात सध्या भीषण दुष्काळ, वाढते प्रदूषण आणि विकासाशी संबंधित अनेक गंभीर समस्या आहेत. या सर्व प्रश्नांवर सभागृहात सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र, केवळ दोन आठवड्यांच्या अधिवेशनात विदर्भातील समस्यांना पुरेसा न्याय मिळणे शक्य नाही. त्यामुळे अधिवेशन किमान तीन आठवडे चालविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

डिलिमिटेशनवरून मविआत मतभेद; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचाही विरोध!

दरम्यान, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या ‘नागपूर करारा’नुसार उपराजधानी नागपुरात किमान एक महिन्याचे हिवाळी अधिवेशन घेणे अपेक्षित असल्याचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, एखादा अपवाद वगळता आजवरच्या सरकारांनी या कराराचे पूर्णपणे पालन केले नसल्याचा आरोप विदर्भवादी संघटनांकडून केला जात आहे.

गेल्या काही वर्षांत हिवाळी अधिवेशनाचा कालावधी सातत्याने कमी होत असल्याने विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळण्याऐवजी अधिवेशन केवळ औपचारिकता ठरत असल्याची भावना वैदर्भीय नागरिक आणि विविध संघटनांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनाच्या कालावधीवरून सभागृहात तसेच सभागृहाबाहेरही संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

____

nagpur-winter-session-two-weeks-vijay-wadettiwar-demand-three-weeks`

error: Content is protected !!