व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण भाजप-ठाकरे गटात पत्रकयुद्ध; नितीन देशमुखांच्या टीकेने भाजप नेते अस्वस्थ?

भाजप-ठाकरे गटात पत्रकयुद्ध; नितीन देशमुखांच्या टीकेने भाजप नेते अस्वस्थ?

आमदारांनी भाषेचा स्तर सोडल्याने प्रतिहल्ले करावे लागत असल्याचे भाजपचे म्हणणे

Akola जिल्ह्यात दिवाळीचा उत्साह ओसरला असला, तरी राजकीय फटाक्यांचा आवाज मात्र थांबण्याची चिन्हे नाहीत. भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका आता पत्रकयुद्धापर्यंत पोहोचली आहे. आमदार नितीन देशमुख यांनी भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवल्यानंतर भाजपकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे आगामी काळात अकोल्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपविरोधात राजकीय संघर्ष सुरू केला आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी दौरे, जनसंपर्क आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून राजकीय वातावरण तापवले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेची भाजपनेही दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांत भाजपकडून आमदार देशमुख यांच्यावर विविध पदाधिकाऱ्यांच्या नावाने पत्रके काढून टीका केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप-ठाकरे गटातील संघर्ष आता उघडपणे पत्रकयुद्धाच्या स्वरूपात समोर आला आहे.

उद्धव ठाकरे मौन सोडा, स्वा. सावरकरांच्या अपमानावर भूमिका स्पष्ट करा

राजकीय निरीक्षकांच्या मते, आमदार देशमुख यांनी जिल्ह्यात काढलेला शेतकरी मोर्चा आणि त्यानंतर समृद्धी महामार्गावर जमवलेले लाखो शेतकरी, या आंदोलनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले शाब्दिक हल्ले तसेच मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी महले यांच्यावर केलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली आहे. अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर संस्थानाच्या विकासाच्या मुद्द्यावरही देशमुख यांनी भाजपला लक्ष्य केले. भाजपला २५ वर्षांत जे जमले नाही, ते एका मुस्लिम आमदाराने करून दाखवल्याचा त्यांचा दावा भाजपसाठी अधिकच जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भाजपचे जिल्हा प्रवक्ते गिरीश जोशी यांनी या पत्रकबाजीमागील भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपच्या नेत्यांवर टीका करताना एकेरी भाषेचा वापर करण्यास आमदार देशमुख यांनी सुरुवात केली. जिल्ह्याच्या राजकीय खेळीमेळीत व्यक्तीवर नव्हे, तर पक्षावर टीका अपेक्षित असते. मात्र, देशमुख यांनी वैयक्तिक पातळीवर टीका केल्याने आम्हालाही त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी या शहरासाठी मोठा त्याग केला असला, तरी त्यांच्यावर टीका करण्यास भाजप मागेपुढे पाहणार नाही, असे जोशी यांनी म्हटले आहे.

गद्दार सेनेला फक्त फोडाफोडी आणि फाडाफाडी आवडते

दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटानेही भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांची शिवसेना कोणाच्या ताटाखालचे मांजर नाही. कुणाच्या दबावाखाली आम्ही झुकणार नाही. चुकीच्या गोष्टी दिसतील, त्यावर बोलणार आणि आंदोलनही करणार. शेतकरी व सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्यांना माफी नाही, अशी भूमिका ठाकरे गटाकडून मांडण्यात आली आहे.

एकंदरीत, अकोल्यातील राजकीय संघर्ष आता वैयक्तिक टीका आणि पत्रकबाजीपर्यंत पोहोचला आहे. भाजप आणि ठाकरे गटातील हा वाद आगामी काळात कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

error: Content is protected !!