व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण बोरगाव मंजू एमआयडीसीसाठी भाजप नेत्यांची २५० एकर जमीन?

बोरगाव मंजू एमआयडीसीसाठी भाजप नेत्यांची २५० एकर जमीन?

ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; कवडीमोल दराने जमीन खरेदी करून पाचपट मोबदला मिळविण्याचा प्रयत्न, भाजपने आरोप फेटाळले

Akola जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी बोरगाव मंजू येथे प्रस्तावित अतिरिक्त एमआयडीसीच्या भूसंपादनावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी भाजपमधील काही नेत्यांनी स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या मालकीची सुमारे २५० एकर शेतजमीन भूसंपादनासाठी प्रस्तावित केल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार यांनी केला आहे. संबंधित नेत्यांनी कवडीमोल दराने जमिनी खरेदी करून भूसंपादनाच्या माध्यमातून त्याचा पाचपट मोबदला मिळविण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकार यांनी हे आरोप फेटाळून लावत आरोपांत तथ्य असल्यास संबंधित जमिनींचे सातबारा उतारे जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे.

मुकेश मुरूमकार यांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. बोरगाव मंजू येथे अतिरिक्त अकोला औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी ५१०.५२ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनास राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने तत्त्वतः मान्यता दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. या औद्योगिक क्षेत्रासाठी सुमारे ७०० हेक्टर जमिनीचा प्रस्ताव असताना त्यापैकी ५१०.५२ हेक्टर क्षेत्राला मान्यता मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

सहायक आयुक्तांना नगरसेवकाकडून मारहाण? सीसीटीव्ही फुटेजमुळे मनपा वर्तुळात खळबळ

भूसंपादनासाठी प्रस्तावित जमिनींपैकी सुमारे २५० एकर जमीन भाजपमधील काही नेत्यांच्या तसेच त्यांच्या नातेवाइकांच्या मालकीची असल्याचा दावा मुरूमकार यांनी केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत एमआयडीसीच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत झाल्याचा संशय व्यक्त करून या जमीन व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अकोला एमआयडीसी ते बोरगाव मंजू या मार्गादरम्यान राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सिसा-मासा आणि बोंदरखेड परिसरातील खडकाळ जमिनी संबंधित नेत्यांनी अल्पदरात खरेदी केल्याचा आरोपही मुरूमकार यांनी केला आहे. या जमिनींच्या भूसंपादनातून मोठा आर्थिक मोबदला मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच संबंधित नेत्यांच्या मालकीचे एमआयडीसी परिसरातील सहा कारखाने आणि लघुउद्योग बंद का पडले, याचाही खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणाची भाजप प्रदेशाध्यक्ष आणि संघटनमंत्र्यांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी मुरूमकार यांनी केली आहे. संबंधित नेत्यांच्या कथित जमीन व्यवहारांची माहिती घेऊन मुख्यमंत्री यांची भेट घेणार असून, शासनाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार त्यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

टोरंट प्रकल्पावरून महायुतीतच मतभेद? अजित पवार गटाची फेरविचाराची मागणी

दरम्यान, या आरोपांना भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महायुती सरकारने केलेल्या विकासकामांमुळे उद्धवसेनेच्या नेत्यांचा जळफळाट होत असून, त्यातूनच भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर बेछूट आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरोपांमध्ये तथ्य असल्यास संबंधित जमिनींचे सातबारा उतारे सार्वजनिक करावेत, असे आव्हानही शिवरकार यांनी दिले आहे. त्यामुळे बोरगाव मंजू येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या भूसंपादनावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!