संघटन बांधणीसह एसआयआरविरोधात पुन्हा सक्रिय
New delhi: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आंदोलन छेडणारी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) सध्या शांत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दिवाळीपूर्वी आंदोलनाला स्थगिती दिल्यानंतर संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट झाली नव्हती. मात्र, सीजेपीचे राष्ट्रीय सहसंयोजक आशुतोष रांका यांनी या चर्चांना उत्तर देत संघटना थंड पडलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. आंदोलनाला काही काळ विराम दिला असला, तरी प्रत्यक्ष जमिनीवर संघटनेचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
एका यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आशुतोष रांका यांनी सीजेपीच्या सध्याच्या कामकाजाची माहिती दिली. देशभरात थंडीचे वातावरण असले, तरी आमची संघटना थंड पडलेली नाही, असे सांगत त्यांनी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी वेगवेगळ्या राज्यांत दौरे करून काम करत असल्याचे स्पष्ट केले. आपण हरियाणाच्या दौऱ्यावर होतो, सौरव उत्तर प्रदेशात शाळांची पाहणी करत आहे, तर संस्थापक अभिजीत दिपके यांनी कोचीचा दौरा केला असल्याचे त्यांनी सांगितले.
वाशिम भाजपमध्ये गटबाजीची चर्चा; जुन्या नेत्यांची नाराजी, नेतृत्वावरून रस्सीखेच?
सध्या संघटनेचे लक्ष दोन ते तीन महत्त्वाच्या विषयांवर केंद्रित असल्याचे रांका यांनी सांगितले. विशेषतः एसआयआर अर्थात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतून ज्यांची नावे वगळली गेली आहेत, अशा नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. त्याचबरोबर ‘स्कूल ठीक करो’ ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. केवळ आंदोलन करून संघटनेचे काम चालणार नाही, तर संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणेही आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुलाखतीदरम्यान सीजेपीच्या प्रमुख नेत्यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्टचा संदर्भ देत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आक्रमकता कमी झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना रांका यांनी २ ऑक्टोबरपासून एसआयआरविरोधात संघटना रस्त्यावर उतरल्याचे सांगितले.
या आंदोलनानंतर निवडणूक आयोगाने वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली, नव्या पिढीतील मतदारांच्या नोंदणीला चालना दिली आणि अर्ज क्रमांक सहामधील काही बदल मागे घेतल्याचे त्यांनी नमूद केले. या काळात संघटनेने उपस्थित केलेल्या मागण्यांवर आयोगाकडून कार्यवाही झाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या बदलांचे संपूर्ण श्रेय केवळ सीजेपीच्या आंदोलनाला देता येणार नाही. इतर राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनीही या विषयावर आवाज उठवला होता, असे रांका यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिवाळीपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना होत असलेल्या अटकसत्राच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. सणासुदीचा काळ कुटुंबीयांसोबत घालवून त्यानंतर नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन संस्थापक अभिजीत दिपके यांनी केले होते. आता संघटनात्मक बांधणी, शैक्षणिक प्रश्न आणि मतदार यादीतील त्रुटींवर लक्ष केंद्रित करत सीजेपीने पुढील कामाची दिशा स्पष्ट केली आहे.








