सरकार व्यापाऱ्यांचे हिट जपणारे, पाच हजार देऊन शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका
Nagpur भाजप आणि आरएसएसचे सरकार हे केवळ व्यापाऱ्यांचे हित जपणारे सरकार असून, महायुतीच्या सर्व मित्रपक्षांनी दुष्काळाचा खेळखंडोबा केला आहे,असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने शेतकऱ्यांना मदत न करण्याचे धोरण स्वीकारले असून, कापूस आणि अन्नधान्याच्या प्रश्नावरून नागपूरमधूनच सरकारविरोधात लक्ष्यकेंद्रित आंदोलन छेडण्याचा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्यातील अन्नधान्य साठ्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्य सरकारकडे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ पुरेल इतका अन्नधान्याचा साठा शिल्लक नाही, मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांकडे मालाचा मोठा साठा आहे. याचा थेट परिणाम होऊन भविष्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडू शकतात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ ५ हजार रुपये देऊन सरकारने त्यांची थट्टा केली आहे. कोणालाही मदत करायची नाही, हीच या सरकारची मूलभूत भूमिका आहे.
विदर्भ आणि मराठवाडा हे देशातील कापूस उत्पादनाचे प्रमुख केंद्र असून, देशातील ६३ टक्के कापूस या दोन्ही भागांतून येतो, याकडे आंबेडकर यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, “सरकारने कापसाला हमीभाव जाहीर केला असला, तरी सीसीआयने अद्याप हमीभावाने खरेदी सुरू केलेली नाही. दुसरीकडे ब्राझीलमध्ये कापसाचे प्रचंड उत्पादन झाले असून तेथील प्रक्रिया क्षमतेपेक्षा उत्पादन जास्त झाल्याने त्यांना जागतिक बाजारपेठ शोधावी लागत आहे.
‘सीजेपी’ थंड पडलेली नाही! आंदोलन स्थगितीच्या चर्चांना आशुतोष रांकांचे उत्तर!
सध्या ३१ ऑक्टोबरपर्यंत आयात होणाऱ्या कापसावर आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. या संदर्भात मागणी करताना आंबेडकर म्हणाले की, ३१ डिसेंबरपर्यंत १७ टक्के असलेले आयात शुल्क ३ टक्क्यांनी वाढवून ते २० टक्के करावे. दुष्काळग्रस्त परिस्थितीत शासनाला शेतकऱ्यांना थेट मदत करता येत नसेल, तर त्यांनी बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करावी. तसेच कापड प्रक्रियेवर आणि तयार कपड्यांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवल्यास बाजारातील दर नियंत्रणात राहतील.
शासनाने या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य तातडीने लक्षात घ्यावे, अन्यथा नागपूरमधून या सरकारविरोधात तीव्र आणि लक्ष्यकेंद्रित आंदोलन उभारले जाईल, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.








