व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण सहायक आयुक्तांना नगरसेवकाकडून मारहाण? सीसीटीव्ही फुटेजमुळे मनपा वर्तुळात खळबळ

सहायक आयुक्तांना नगरसेवकाकडून मारहाण? सीसीटीव्ही फुटेजमुळे मनपा वर्तुळात खळबळ

कामाच्या मुद्द्यावरून वाद, मारहाणीचा आरोप; नगरसेवकांकडून आरोप फेटाळले

Amravati महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ३ चे सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक संजय गव्हाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कथित मारहाणीचा हा प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे अमरावती महानगरपालिकेतील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अधिकारी आणि कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दुसरीकडे, नगरसेवक गव्हाळे यांनीही सहायक आयुक्तांवर प्रत्यारोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक संजय गव्हाळे हे काही कामासंदर्भात आपल्या सहकाऱ्यांसह सहायक आयुक्त नितीन बोबडे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. या वादादरम्यान गव्हाळे यांनी जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप बोबडे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी २० नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर केली आहे.

टोरंट प्रकल्पावरून महायुतीतच मतभेद? अजित पवार गटाची फेरविचाराची मागणी

दरम्यान, नगरसेवक संजय गव्हाळे यांनी सहायक आयुक्तांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कामासंदर्भात भेटण्यासाठी गेलो असता नितीन बोबडे यांनीच अरेरावीची भाषा वापरल्याचा प्रतिआरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

अधिकारी-कर्मचारी संघटना आक्रमक

महानगरपालिकेच्या कार्यालयातच वरिष्ठ अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप समोर आल्याने अधिकारी आणि कर्मचारी संघटनांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

डीलिमिटेशनसाठी खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

तक्रार निवडणूक विभागाकडे

सहायक आयुक्त नितीन बोबडे यांनी आयुक्तांकडे सादर केलेल्या तक्रार निवेदनाची प्रत कायदेशीर तरतुदींची तपासणी करण्यासाठी निवडणूक विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!